खूशखबर! केसगळतीवर रामबाण उपाय

घाबरू नका. तुमच्या टकलावरही घनदाट केस उगवतील असा उपाय सापडला आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 26, 2017, 10:51 PM IST
खूशखबर! केसगळतीवर रामबाण उपाय title=

मुंबई : स्त्रिया फारसे नाही. पण, आपल्यापैकी बहुतांश पुरूष केसगळतीमुळे हैराण असतात. इतके की, ही गळती पुढे टकलामध्ये परावर्तीत होते आणि टक्कल हिच एक समस्या होऊन बसते. पण, आता घाबरू नका. तुमच्या टकलावरही घनदाट केस उगवतील असा उपाय सापडला आहे.

दैनंदिन धावपळ, काळ, काम वेग यांचे बिघडलेले व्यवस्थापन. खाण्या-पिण्याच्या सवयी या सर्वांचा परिणाम म्हणून केसगळतीची समस्या केवळ ज्येष्ठच नव्हे तर, आता तरूणांमध्येही दिसू लागली आहे. पण आता चिंता करण्याची गरज नाही. संशोधकांनी केसगळती आणि टकलावर रामबाण उपाय शोधून काढला आहे.

दक्षिण कोरियातील संशोधकांनी लावला शोध

दक्षिण कोरियातील वैज्ञानिकांनी एक असा बायोकेमिकल पदार्थ निर्माण केला आहे की, जो टक्कल पडक्या डोक्यावर लावला की, तेथे केस उगवायला मदत होते. हे संशोधन करणाऱ्या चमूचे प्रमुख योनसेई विद्यापीठातील प्रोफेसर कॅंग येल यांनी या संशोधनाबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. या माहितीत ते म्हणतात, 'आम्ही एका अशा प्रोटीनचा शोध लावला आहे की, जो केसगळती आटोक्यात आणतो तसेच, नव्याने केसनिर्मिती होण्यासही मोठी मदत करतो. यासोबतच आम्ही असाही एक पदार्थ निर्माण केला आहे की, जो टक्कल पडलेल्या डोक्यावरही केस निर्मिती करू शकतो.' 

केसगळती रोखण्यासाठी बनविणार औषध

कॅग येल यांनी पुढे म्हटले आहे की, 'आम्हाला खात्री आहे की, हा पदार्थ एक अशा प्रकारचे औषध बनविण्यासाठी कामी येईन. जो केवळ केसगळतीच थांबवणार नाही. तर, केस उगवण्यासही मदत करेन. या पदार्थाच्या मदतीने अशा प्रकारचे औषध लवकरच आम्ही निर्माण करू, असा दावाही कॅग यांनी केला आहे.

उंदरावर केला प्रयोग

आतापर्यंत टकलावर एकच उपाय उपलब्ध आहे. तो म्हणजे केसांचे ट्रान्सप्लांट. पण, आम्ही या पदार्थाचा उपयोग उंदरावर केला. धक्कादायक असे की, आम्हाला 28 दिवसांतच परिणाम दिसून आला. उंदराच्या अंगावर 28 दिवसांतच नवे केस दिसू लागले, असाही दावाही कॅग यांनी माहिती देताना केला.