corona : तब्बल दोन वर्ष कोरोनाचं (Corona) महाभंयकर दुष्टचक्र अनुभवल्यानंतर आता कुठे आपण सर्वजण मोकळा श्वास घेतोय. अशातच चीन (China) आणि अमेरिकेतून (America) धोक्याची घंटा वाजू लागली आहे. चीनमध्ये परिस्थिती पुरती हाताबाहेर गेली आहे. चीनमध्ये 20 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी NCDC आणि ICMR ला पाठवलं पत्र पाठवलंय.
केंद्रा सरकारच्या ऍडव्हायजरीनुसार चीन, अमेरिका, जपान, ब्राझील, कोरियात कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्व राज्यांनी कोरोना स्थितीवर लक्ष ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. जिनोम सिक्वेन्सिंगवर लक्ष केंद्रित करा असंही यामध्ये सांगण्यात आलंय. तसंच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबतही सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
चीनच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार ओमायक्रोच्या 2 नव्या सब व्हेरिएंटमुळे चीनमध्ये कोरोनाने पुन्हा हात पाय पसरले आहेत. चीनच्या अनेक शहरातील रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचे बीए.5.2 आणि बीएफ.7 हे सब व्हेरिएंट आढळले आहेत. या दोन व्हेरिएंटमुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
चीनची राजधानी बीजिंगमध्ये (Coronavirus in Beijing) ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BF.7 (Omicron Subvariant BF.7) ने धुमाकूळ घातला आहे. अनेक रुग्णांमध्ये या व्हेरिएंटची लक्षणं आढळली आहेत. यामुळे बीजिंगमधील आरोग्य व्यवस्था पुरती ढासळली असून रुग्णालयाबाहेर उपचारासाठी रुग्णांच्या रांगा लागल्या आहेत.
चीनचे तज्ज्ञ वू जुन्यो यांनी पुढच्या तीन महिन्यात कोरोनाच्या तीन लाटा येण्याची भीती व्यक्त केली आहे. चीन सध्या पहिल्या लाटेचा सामना करत आहे. 15 जानेवारीच्या आसपास कोरोनाचा कहर आणखी वाढू शकतो. 21 जानेवारीला चीनचा लूनार न्यू इयरला सुरुवात होत आहे, यावेळी लोकं मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतील. यानंतर दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाटेची शक्यात तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.