Alert: भारतात मंकीपॉक्सचा शिरकाव? 5 वर्षांच्या मुलीमध्ये आढळली लक्षणं

मंकीपॉक्स म्हणजे काय? वाचा या आजाराची काय आहेत लक्षणं, कशी घ्याल काळजी

Updated: Jun 4, 2022, 04:32 PM IST
Alert: भारतात मंकीपॉक्सचा शिरकाव? 5 वर्षांच्या मुलीमध्ये आढळली लक्षणं title=

Monkeypox Virus : अनेक युरोपीय देशांमध्ये गेल्या एक महिन्यापासून मंकीपॉक्सच्या संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. हा संसर्ग मध्य आणि पश्चिम आफ्रिकेच्या काही भागांमध्ये अधिका प्रमाणात दिसून येत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला मंकीपॉक्स आजाराचा पहिला रुग्ण इंग्लंडमध्ये आढळला होता. त्यानंतर आता हा आजार कॅनडा, ऑस्ट्रेलियासह नऊ युरोपियन देशांमध्ये वेगाने पसरला आहे. 

मंकीपॉक्स आजाराने आता भारतातही शिरकाव केल्याची भीती व्यक्त केली जात आहे. उत्तर प्रदेशमधल्या गाझियाबादच्या आरोग्य विभागाने संशयाच्या आधारावर पाच वर्षांच्या मुलीचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीला ऐकण्याची समस्या आहे, ज्यासाठी ती बिहारमधून गाझियाबाद रुग्णालयात आली होती. यावेळी तपासणीदरम्यान डॉक्टरांना तिच्या त्वचेवर पुरळ आढळले. तसंच पुरळ असलेल्या ठिकाणी तिलाही सारखी खाज येत होती. ही लक्षणे मंकीपॉक्ससारखीच आहेत, त्या आधारावर नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

भारतात मंकिपॉक्सचा शिरकाव?
मंकीपॉक्स हा एक संसर्गजन्य आजार आहे, जो संक्रमित ठिकाणी गेल्याने किंवा संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतो. या मुलीचा अलीकडील कोणताही प्रवासाचा इतिहास नाही किंवा ती गेल्या एका महिन्यात परदेशात गेलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात आली नाही. अशा परिस्थितीत तिला मंकीपॉक्स झाला असण्याची शक्यता फारच कमी आहे. 

ही लक्षणं मंकीपॉक्ससारखीच दिसत असली तरी त्यााबाबत ठोस माहिती नाही.  नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या संसर्गापासून सर्व नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. 

मंकीपॉक्स आजाराबद्दल जाणून घेऊया
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, मंकीपॉक्स हा विषाणूजन्य आजार आहे. जगातील अनेक विकसित देशांमध्ये या आजाराचं वाढतं प्रमाण चिंताजनक आहे. मंकीपॉक्स संसर्ग संक्रमित व्यक्ती किंवा प्राणी यांच्या जवळच्या संपर्कातून पसरतो, त्याची लक्षणे 2 ते 4 आठवडे टिकू शकतात. हे फार प्राणघातक नाही पण अनेक बाबतीत ते गंभीर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात. गंभीर प्रकरणांमध्ये त्याचा मृत्यू दर 3-6 टक्के असल्याचं नोंदवलं गेलं आहे.

मंकीपॉक्स आजार कसा ओळखाल
WHO ने सर्व लोकांना मंकीपॉक्सच्या लक्षणांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचं आवाहन केले आहे. मंकिपॉक्स संसर्गामध्ये जास्त ताप, डोकेदुखी,  स्नायू दुखणे आणि अशक्तपणा यांचा समावेश असू शकतो. रुग्णाच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायांवर मोठ्या आकाराचे पुरळ दिसून येते. संसर्गाचा काळ 6 ते 13 दिवसांचा असतो.

मंकिपॉक्सपासून वाचण्यासाठ काय करावं?
भारत अजूनही या संसर्गापासून सुरक्षित आहे. संसर्ग टाळण्यासाठी जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण केलं जाते. मंकीपॉक्स टाळण्यासाठी, मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतून नुकतेच परतलेल्या लोकांशी संपर्क टाळा. काही युरोपीय देशांमध्येही त्याची प्रकरणे वाढली आहेत, त्याचीही काळजी घेतली पाहिजे. युरोपीय देशांतूनही भारताकडे वाहतूक सुरू आहे, अशा परिस्थितीत आरोग्य विभागाने संभाव्य धोक्याचा इशारा दिला आहे.