Fake Drugs on Cancer: तुमच्या जवळच्या व्यक्तीला यकृताचा आजार आहे? तुमच्या जवळच्या व्यक्तीला कर्करोगाची (Cancer) बाधा झालीय? तर मग सावधान. कारण या रोगांवरची नकली औषधं (Fake Drugs) बाजारात सर्रास विकली जातायत. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयनं (DCGI) याबाबत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना खबरदारीचा इशारा दिलाय. जागतिक आरोग्य संघटना अर्थात डब्ल्यूएचओनं (WHO) देखील याबाबत सावध केलंय.
नकली औषधांपासून सावधान
भारतात यकृत आजारांवरील डिफिटेलियो नावाच्या औषधाचा नकली साठा उपलब्ध आहे. एवढंच नाही तर कर्करोगावरील एडसेट्रिस इंजेक्शनचा देखील नकली साठा विकला जातोय. ही औषधं रुग्णांना खासगी स्तरावरून उपलब्ध केली जातात. या औषधांची विक्री प्रामुख्यानं ऑनलाईन होते. मात्र अधिकृत औषधाऐवजी बनावट औषधाची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचं डीसीजीआयनं सांगितलंय. भारतासह तुर्कस्थानातही नकली औषधांचा सुळसुळाट असल्याचं WHOनं स्पष्ट केलंय..
केवळ रुग्णांनाच नव्हे, तर ही औषधं घेण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरांनाही सावधगिरी बाळगण्याचं आवाहन डीसीजीआयनं केलंय. ही औषधं घेण्याचा सल्ला देताना रुग्णांना नकली औषधांबाबत सावध करा तसंच औषधांच्या सेवनामुळं आरोग्यावर विपरित परिणाम झाला तर तत्काळ हॉस्पिटलशी संपर्क करा, असं आवाहनही करण्यात आलंय. ही नकली औषधं ओळखणं सामान्य लोकांना शक्य नाही. त्यामुळं अधिकृत केमिस्ट दुकानातूनच ती खरेदी करावीत. अन्यथा ही औषधच रुग्णांसाठी प्राणघातक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.