निपाहचा वाढता धोका! बचावासाठी उपाय काय?

 या व्हायरसने ग्रस्त असलेल्या एका तरूणावर उपचार करताना लागण झाल्याने एका नर्सचाही या व्हायरसने बळी घेतला आहे

Updated: May 22, 2018, 01:48 PM IST
निपाहचा वाढता धोका! बचावासाठी उपाय काय? title=

नवी दिल्ली: निपाह व्हायरसने दक्षिण भारतात मोठे आव्हान तयार केले आहे. राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशभरात या व्हायरसने घबराटीचे वातावरण निर्माण केले आहे. या व्हायरसपासून मृत्यू पावलेल्या लोकांचा अधिकृत आकडा अद्याप पुढे आला नाही. मात्र, या आकड्यात सतत वाढ होत असल्याचे दिसते. या व्हायरसने ग्रस्त असलेल्या एका तरूणावर उपचार करताना लागण झाल्याने एका नर्सचाही या व्हायरसने बळी घेतला आहे. दरम्यान, या व्हायरसला नियंत्रीत करणारी लस अद्याप उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले जात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, चक्कर येणे, ताप येणे, डोकेदुखी, श्वसनास त्रास होणे अशी या व्हायरसची लागण झाल्याची लक्षणे आहेत. 

केंद्र सरकारकडूनही जोरदार हालचाली

दरम्यान, या व्हायरसला आटोक्यात आणणारी कोणती लस सध्या तरी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. पण, प्राथमिक लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य वेळी उपचार करणे यांमुळे पीडित व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालय या व्हायरसला नियंत्रणात ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.  

संसर्गजन्य आजार

दरम्यान, निपाह व्हायरस हा एक प्रकारचा संक्रमीत आजार आहे. जो प्राणी, पशू-पक्षांनी झाडावर खाल्लेली फळे, फळे यांच्यात आणि त्यानंतर माणसांत संक्रमीत होतो. या व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तिचा मृत्यू होऊ शकतो. आतापर्यंत या व्हायरसने काही लोकांचा बळी घेतला आहे. चिंताजनक असे की, आतापर्यंत या रोगावर नियंत्रण मिळवणारी कोणतीही लस उपलब्ध होऊ शकली नाही.

भारतात निपाहचा हल्ला

भारतात निपाह व्हायरसने डोके वर काढणे ही पहिली वेळ नाही. साधारण २००१च्या जनेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातही पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये निपाहने काही काळ डोके वर काढल्याची नोंद आहे. त्या काळात सुमारे ६६ लोकांना निपाहचे संक्रमण झाल्याची नोंद आहे. त्यावेळीही योग्य उपचार न मिळाल्याने ४५ नागरिकांचा मृत्यू झाला होता. निपाह व्हायरसने २००७मध्ये दुसऱ्यांदा डोके वर काढले. पश्चिम बंगालच्या नादिया येथे निपाहने दुसऱ्यांदा डोके वर काढले होते. त्यावेळीही ५ नागरिकांना निपाहची लागण झाली होती. त्यातील पाचही नागरिकांचा मृत्यू झाला होता.

जागतीक आरोग्य संघटना (डब्ल्बुएचओ) ने म्हटल्यानुसार, निपाह व्हायरस हा वटवागुळाकडून फळांमध्ये पसरतो आणि त्याच्या माध्यमातून प्राणी आणि मानवात संक्रमीत होतो. वटवागूळ आमि फ्लाईंग फॉक्स हे निपाह आणि हेंड्रा नावाच्या व्हायरसचे वाहक समजले जातात. हा व्हायरस वटवागूळाचे मल, मूत्र आणि लाळेतून पसरतो. प्राप्त माहितीनुसार खजूराची शेतीत काम करणाऱ्या लोकांवर या व्हायरसचा अधिक प्रभाव असल्याची चर्चा आहे.

जगभरातही निपाहचा प्रभाव

१९९८मध्ये पहिल्यांदा मलेशियातील कांपूंग सुंगईमध्ये निपाहचे प्रकरण पुढे आल्याचे दिसते. त्यानंतर १९९९मध्येही सिंगापूरमध्ये निपाह व्हायरसची लागण झाल्याचे पुढे आले. दरम्यान, २००४मध्ये निपाह व्हायरसचे प्रकरण बांगलादेशात पुढे आले.  या व्हायरसचे पहिला जिवाणू मलेशियातील पाळीव डुकरांमध्ये सापडला. त्यानंतर तो इतर पाळीव प्राणी जसे की, मांजर, बकरी, कुत्रा, घोडा आदी प्राण्यांमध्ये सापडला. त्यानंतर कालांतराने निपाह व्हायरसचा माणसांनाही लागण झाल्याची माहिती पुढे आली.

निपाहची लक्षणे

निपाह व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तिला प्रचंड ताप, डोकेदुखी, अंगदुखी, मानसिक भ्रम, कोमा, गोंधळल्याची स्थिती निर्माण होणे अशी लक्षणे संभवतात. निपाह व्हायरसग्रस्त लोकांना श्वसनास त्रास होतो. तसेच, श्वास घेताना जळजळल्यासारखेही वाटते. या रूग्णाचा मृत्यूदेखील होऊ शकतो. डॉक्टर सांगतात की, काही रूग्ण २४ ते २८ तासांतच कोमामद्ये जाऊ शकतो.

उपचार

निपाह व्हायरसवर अद्याप तरी कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे मलेशियातही निपाह व्हायरसच्या संक्रमणामुळे सुमारे ५० टक्के लोकांचा मृत्यू झाला होता. या व्हायरसवर लस शोधण्यासाठी संशोधक काम करत आहेत. पण, तोपर्यंत स्वत:हून होता येईल इतकी काळजी घेणे हाच इलाज आहे. त्यासाठी संशयास्पद ठिकाणची फळे, पक्षांनी खाल्लेली फळे न खाणे, खास करून खजूर न खाणे, निपाहची लागण झालेल्या व्यक्तिच्या संपर्कात न येणे, डुकरांपासून दूर राहणे आदी गोष्टींची दक्षता घेता येऊ शकते.