मुंबई : शरीराप्रमाणेच केसांनाही पोषण मिळणं गरजेचे आहे. केसांना मुबलक प्रमाणात पोषण मिळावे याकरिता तेल लावणं, आहारात पोषक घटकांचा समावेश करणं आवश्यक आहे.
पोषणाअभावी केस निस्तेज होणं, फ्रिजी होणं आणि केस दुतोंडी होण्याच्या समस्या वाढतात. अनेकदा स्प्लिट एंड्स म्हणजेच दुतोंडी केसांचा त्रास कमी करण्यासाठी केस कापणं हा एक पर्याय सुचवला जातो. मात्र केस न कापताही स्प्लिट एन्ड्सचा त्रास आटोक्यात ठेवता येऊ शकतो.
केसांच्या आरोग्यासाठी पपई फायदेशीर आहे. पपईचा गर कपभर दह्यामध्ये मिसळा. त्यामध्ये थोडं मध मिसळून हा हेअर पॅक केसांवर लावा. मधामुळे केसांची चमक वाढण्यास मदत होईल सोबतच दुतोंडी केसांचा त्रासही कमी होईल.
एरंडेल आणि मोहरीचं तेल समप्रमाणात मिसळा. या तेलाने केसावर मसाज करा. नारळाचं आणि बदामाचं तेलही केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ऑलिव्ह ऑईल थोडं गरम करून केसांवर लावा. हे केसांवर कंडिशनरप्रमाणे काम करते.