Omicron पासून किती संरक्षण देणार कोविशील्डचा बूस्टर डोस?

ओमायक्रॉनचा प्रसार पाहता आता इम्यूनिटी वाढण्यासाठी बूस्टर डोस देण्याची मागणी केली जातेय.

Updated: Dec 11, 2021, 11:12 AM IST
Omicron पासून किती संरक्षण देणार कोविशील्डचा बूस्टर डोस? title=

ब्रिटन : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. हा नवा व्हेरिएंट जलद गतीने लोकांना संक्रमित करत असल्याचं समजलं आहे. यानंतर आता इम्यूनिटी वाढण्यासाठी बूस्टर डोस देण्याची मागणी केली जातेय. अशातच यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी (UKHSA) ने शुक्रवारी सांगितलं की, कोविड-19 लसीचा तिसरा म्हणजेच बूस्टर डोस ओमायक्रॉन प्रकाराच्या लक्षणात्मक संसर्गापासून 70-75 टक्के संरक्षण देऊ शकते.

हेल्थ एजेंसीच्या माहितीप्रमाणे, भारतातील कोविशील्ड नावाने वापरली जाणारी ऑक्सफोर्ड/एस्ट्राजेनेका आणि फायझर/बायोएंडटेकच्या लसीच्या दोन्ही डोस कोविडच्या डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत ओमायक्रॉनविरूद्ध कमी सुरक्षा देतात. 

दरम्यान लसीचा तिसरा म्हणजेच बूस्टर डोस व्हेरिएंटविरोधात इम्यूनिटी बूस्ट करतो असा दावा संक्रमित प्रकरणांमधील डेटाच्या विश्लेषणावर आधारित आहे.

UKHSA च्या सांगण्यानुसार, सध्याच्या परिस्थितीत कोणताही बदल न झाल्यास या महिन्याच्या अखेरीस ब्रिटनमध्ये संसर्गाची प्रकरणं दहा लाखांच्या पुढे जातील असा अंदाज आहे. प्राथमिक डेटाने असं लक्षात आलंय की, बूस्टर डोस नवीन व्हेरिएंटविरूद्ध 70-75 टक्के संरक्षण देऊ शकतो. हे आकडे पूर्णपणे नवीन असले तरी त्यामुळे अंदाजात बदल होण्याची शक्यता आहे. 

UKHSA मधील लसीकरण प्रमुख डॉ. मेरी रामसे म्हणाल्या, 'एकंदरीत दुसऱ्या डोसनंतर काही दिवसांनी, डेल्टा प्रकाराच्या तुलनेत ओमायक्रॉनचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. आम्हाला आशा आहे की कोविड-19 च्या गंभीर लक्षणांवर ही लस चांगला परिणाम देईल. जर तुम्ही अद्याप लसीचा पहिला डोस घेतला नसेल, तर ती लवकरात लवकर घ्या."