पांढरे केसांच्या समस्येवर करा घरगुती उपाय

केमिकलयुक्त रंगाचा शरीरावर वाईट परिणाम होत असतो.

Updated: Apr 29, 2019, 01:36 PM IST
पांढरे केसांच्या समस्येवर करा घरगुती उपाय  title=

मुंबई : अकाली केस पांढरे, सफेद होणं अगदी सामान्य बाब असली तरी चिंतेचा विषय झाला आहे. लहान मुलांमध्यही केस पांढरे होण्याचं प्रमाण मोठ्या पटीने वाढलं आहे. केस पांढरे होण्यामागे अनेक कारणं आहेत. आनुवंशिकता, धूळ, प्रदूषण, खाण्यापिण्यात झालेले बदल, अधिक ताण, केसांची काळजी न घेतली गेल्याने केसांचं गळणं, पांढरं होणं अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. केस पांढरे होण्यावर बाजारत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु बाजारातील या पर्यांयामधून फाद्याऐवजी नुकसान होण्याचाच मोठा धोका असतो. बाजारातील केमिकलयुक्त रंगांमुळे केस काही वेळासाठी काळे होतात, केसांना रंग चढतो परंतु कालांतराने पुन्हा केस जैसे थे होतात. केमिकलमुळे केसांवर घातक परिणाम होतात. केस अधिक पांढरे होतात, गळतात. केमिकलयुक्त रंगाचा शरीरावरही वाईट परिणाम होत असतो. डोळ्यांची जळजळ, केसात, त्वचेवर खाज येणं, इन्फेक्शन होणं अशा समस्यांमुळे केसांच आरोग्य सुधारण्याऐवजी केस आणि शरीर दोघाचं आरोग्य बिघडवत असतो. त्यामुळे केसांच्या पांढऱ्या होणाऱ्या समस्येवर काही घरगुती, आयुर्वेदिक तसंच नैसर्गिक उपयांनी केस काळे करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. कालांतराने या नैसर्गिक उपायांचा फायदा दिसू लागतो. 

आवळा - 

काही सुकवलेले आवळे नारळ्याच्या तेलात चांगले उकळवा. त्यानंतर हे तेल काचेच्या बाटलीत भरुन ठेवा. कमीत कमी एक तास किंवा रात्री झोपताना तेल लावून केसांच्या मुळांमध्ये मसाज करा. आठवड्यातून २ ते ३ वेळा तेलाचा वापर करा. सतत तीन महिने हा प्रयोग केल्याने चांगला फायदा होतो. आवळ्यासोबत नारळाच्या तेलाऐवजी बदाम तेलाचाही वापर करा. तेल उकळवताना कमी तापमानावर उकळवा. अधिक तापमानात उकळवताना तेलातील पोषक द्रव्ये नष्ट होतात.

कडिपत्ता -

केस धुण्यात साध्या किंवा अगदी कोमट पाण्यात कडिपत्त्यांची पानं एक तास आधी टाकून ठेवा. त्याच पाण्याने केस धुवा. आवळ्याप्रमाणे कडिपत्त्यांची पानंही तेलात उकळवून ते तेल लावू शकता. कडिपत्त्यांच्या पानांची पेस्टही केसांना लावू शकता.

लिंबू -

नारळाच्या तेलात लिंबू पिळून ते लावल्यानेही फायदा होतो. हे मिश्रण पुरुष दाढीलाही लावू शकतात. आठवड्यातून दोन वेळा याचा उपयोग करा.

ब्लॅक टी आणि मेहेंदी -

चहा पावडर पाण्यात उकळून थंड करुन केसांना लावल्याने चांगला रंग येतो. चहाऐवजी ब्लॅक कॉफीचाही उपयोग करता येतो. आठवड्यातून ३ वेळा हा प्रयोग करा. मेहेंदी भिजवताना त्यात चहाचं उकळलेलं पाणी टाका. याशिवाय मेहेंदीत आवळ्याचा रस, लिंबू रस किंवा दही, शिकेकाई पावडर, मेथी दाण्यांची पावडर टाकून मेहेंदी लावा याने नैसर्गिक रंग येतो. 

कांदा -

कांद्याचा रस किंवा पेस्ट आठवड्यातून २ ते ३ वेळा लावल्याने चांगला फायदा होतो. केस धुण्याआधी हा उपाय सतत केल्याने कालांतराने केस नैसर्गिकरित्या काळे होण्यास सुरुवात होते. 

तूप -

गायीचं तूप केसांच्या मूळाशी लावून मसाज केल्याने पांढऱ्या केसांची समस्या कालांतराने नष्ट होते.