मुंबई : पोषक आहाराच्या अभावामुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या वाढते. काहिरा युनिव्हर्सिटीच्या अहवालानुसार, अकाली केस पांढरे होण्याची समस्या हृद्याच्या आरोग्याशी निगडीत आहे. संशोधकाच्या दाव्यानुसार अकाली केस पांढरे होणे हे हृद्यविकाराचे संकेत देतात.
पुरूषांमध्ये अकाली केस पांढरे होण्याची समस्या असल्यास त्यांना हृद्यरोगाचा धोका अधिक असतो. मग अकाली केस पांढरे होण्याची समस्या आटोक्यात ठेवायची असल्यास या घरगुती आणि सुरक्षित उपायांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.
आवळा - केसांच्या आरोग्यासाठी आवळा हा अत्यंत उपयुक्त आहे. नियमित आवळ्याचा आहारात समावेश करणंही हितकारी आहे. अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेहंदीमध्ये आवळ्याची पेस्ट मिसळा. किंवा आवळ्याचा रस गरम नारळाच्या तेलात मिसळून डोक्याला लावणं हितकारी आहे.
काळामिरी - काळामिरीचे दाणे किंवा काळामिरी पावडर पाण्यात उकळा. शाम्पूनंतर केस या पाण्याने धुवावेत. नियमित हा उपाय केल्याने केसांचे आरोग्य सुधारेल.
दूध पिणं हाडांना बळकटी देते. सोबत केसांच्या आरोग्यासाठीदेखील हे आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा गाईचं दूध केसांना लावा. यामुळे केस काळे होण्यास मदत होते.
कढी पत्ता आहाराचा स्वाद वाढवतो, त्यासोबतच केसांच्या आरोग्यासाठीदेखील फायदेशीर आहे. पाण्यात तास - दोन तास कढीपत्त्याची पानं मिसळा. या पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. नारळाच्या तेलात कढीपत्त्याच्या पानांचा रस मिसळून लावल्याने फायदा होतो.
कोरफड - त्वचेसोबतच केसांच्या आरोग्यासाठीदेखील कोरफड फायदेशीर आहे. नियमित कोरफडीचा वापर केल्याने केस काळे होण्यास मदत होते. केसगळतीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो. कोरफडीच्या गरामध्ये लिंबाचा रस मिसळून लावल्यास केसांचे आरोग्य सुधारते.
कांदादेखील केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केस धुण्यापूर्वी काही वेळ कांद्याचा रस केसांना लावा. यामुळे अकाली केस पांढरे होण्याची समस्या आटोक्यात राहते. सोबतच केसगळतीचा त्रास कमी होतो.