मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा आता चांगलाच वाढला आहे. उन्हाळ्यात आरोग्याबरोबरच सौंदर्याच्याही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्वचा टॅन होते तसेच केसही धुतल्यानंतर अगदी २ दिवसातच घामामुळे चिकचिकीत होतात. त्यांना वास येऊ लागतो. अनेकदा वारंवार केस धुणे शक्य नसते. मग या लवकर खराब आणि चिकचिकीत होणाऱ्या केसांचे काय करायचे? तर अगदी सोपे आहे. हे घरगुती उपाय करा. त्यामुळे केस लवकर चिकचिकीत होणार नाहीत.
#1. एक कप पाण्यात लिंबाचे काही थेंब घाला. शॅम्पू केल्यानंतर या मिश्रणाने केस धुवा. लिंबातील अॅसिडीक गुणधर्मामुळे केस लवकर चिकचिकीत होणार नाहीत.
#2. अंड्याच्या सफेद भागात लिंबाचे काही थेंब घाला. हे मिश्रण केसांना लावून १५-२० मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने केस धुवा. केस मऊ मुलायम होतील.
#3. बेकींग सोडा केस आणि त्वचेच्या समस्यांवर अतिशय फायदेशीर ठरतो. ३ चमचे बेकिंग सोड्यात पाणी घाला आणि हे मिश्रण केसांना मुळांपासून लावा. २० मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने धुवा.
#4. एक कप पाण्यात २ चमचे चहापावडर घालून १० मिनिटे उकळवा. मग ते मिश्रण गाळा. थंड झाल्यावर केसांना लावा. ५-१० मिनिटांनी केस सौम्य शॅम्पूने धुवा.