सावधान| तुम्हीपण रात्री झोपताना डास पळवण्यासाठी अगरबत्ती लावता का?

डासांचा उपद्रव थांबवण्यासाठी अनेकजण अगरबत्त्यांचा वापर करतात.

Updated: Dec 11, 2021, 10:59 PM IST
सावधान| तुम्हीपण रात्री झोपताना डास पळवण्यासाठी अगरबत्ती लावता का?   title=

मुंबई : डासांचा उपद्रव थांबवण्यासाठी अनेकजण अगरबत्त्यांचा वापर करतात. हर्बल अगरबत्तीची जाहिरात करुन लोकांच्या जीवाशी खेळलं जातंय. अशा अवैध डास प्रतिबंधक अगरबत्त्या आरोग्याला अपायकारक असल्याचा इशारा HICA संस्थेने दिला आहे. (Home Insect Control Association urges not to use illegal mosquito repellent to reduce health risks)   

एकीकडे कोरोनाचा कहर असताना डेंग्यूनंही डोकं वर काढलंय. गेल्या महिनाभरात देशभरात 1 लाख 16 हजार 991 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रासह उत्तर भारतात सर्वाधिक रुग्ण आहेत. 

डासांचा बिमोड करण्यासाठी नागरिकही युद्धपातळीवर प्रयत्न करताना दिसतात. स्वस्त, सुगंधी आणि नैसर्गिक तत्त्व असल्याचा दावा करणा-या अगरबत्त्यांचा वापर वाढला आहे. मात्र अशा अगरबत्त्यांचा धूर शरीराला धोकादायक ठरु शकतो. कारण या अगरबत्त्या अवैधरित्या आणि घातक रसायनानं बनलेल्या असतात. 

त्यानं अस्थमा, श्वसनाला त्रास, डोळे चुरचरणे  असा त्रास होऊ शकतो. आरोग्याला अपायकारक पेस्टिसाईड त्यात असतात, असा धोक्याचा इशारा होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन म्हणजेच हिका या संस्थेनं दिलाय.   

अशा अगरबत्तीच्या पुड्यावरील सीआयआर नंबर, बॅच नंबर, मॅन्यूफॅक्चरिंग, एक्सप्रायररी डेटची माहिती ग्राहकांनी आवर्जून पहावी.  अवैध अगरबत्यांच्या पुड्यावर ही माहिती नसते. तेव्हा डास पळवण्याच्या नादात आपलं आरोग्य धोक्यात घालू नका.