मुंबई : भारतीय मसाले हे भारतीय खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. मात्र केवळ आहारापुरता हे मसाले मर्यादीत नसून त्याचा औषधामध्येही प्रामुख्याने वापर केला जातो. भारतीय मसाल्यांमध्ये औषधी गुणधर्म असल्याने अनेक आजारांचा धोका कमी करण्याची क्षमता आहे. दालचिनी हा असाच भारतीय मसाल्यांपैकी एक पदार्थ असल्याचा खुलासा करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया विश्वविद्यालयामध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार दालचिनीमध्ये अॅन्टीबायोटीक्स गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे अनेक बॅक्टेरियांशी लढण्याची क्षमता दालचिनीमध्ये आहे.
संशोधकांच्या दाव्यानुसार, दालचिनीतील इसेन्शियल ऑईलमध्ये व्हायरल इंफेक्शन कमी करण्याची क्षमता आहे. त्याचा वापर औषधांमध्ये केला जातो. त्यामुळे अॅन्टिबायोटिक्स बनवण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. आहाराप्रमाणे सौंदर्य खुलवण्यासाठीदेखील दालचिनीचा वापर केला जातो. मग बॅक्टेरियांचा धोका कमी करण्यासाठी सुपरबगशी लढण्यासाठी शरीराला सक्षम करण्यासाठी दालचिनी फायदेशीर ठरते.
पावसाळ्याच्या दिवसात कमजोर झालेली रोगप्रतिकारक्षमता सुधारण्यासाठी दालचिनी फायदेशीर ठरते. सर्दी, खोकलासोबतच व्हायरल इंफेक्शनचा धोका कमी करण्यासाठी दालचिनी फायदेशीर ठरते. त्यासाठी चमचाभर दालचिनी पावडर मधामध्ये मिसळून नियमित त्याचे सेवन केल्यास पावसाळ्यात होणारा त्रास कमी होण्यास मदत होते.
आहारात दालचिनीचा वापर केल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पोटदुखी, अपचनाचा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते. उलटी, बद्धकोष्ठता असे त्रास कमी करण्यासाठीदेखील दालचिनी मदत करते. म्हणूनच पावसाळ्यात गरम सूप पित असाल तर त्यावर दालचिनीची पावडर मिसळू शकता.
लठ्ठपणाची समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी दालचिनी फायदेशीर आहे. लाईफस्टाईल किंवा जेनेटिक कारणांमुळे अनेकांमध्ये लठ्ठपणाचा त्रास जाणवतो. मात्र आहारात अशावेळेस दालचिनीचा समावेश केल्यास त्याच्याशी सामना करण्यास मदत होते.
हाडांचे दुखणे कमी करण्यासाठी, सांधेदुखीचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी दालचिनी मदत करते. दालचिनीमधील दाहशामक घटक हाडांमधील सूज कमी करण्यासाठी मदत करते. सेक्स लाईफ सुधारण्यासाठीदेखील त्याची मदत होते.
मधुमेहाच्या रूग्णांसाठी दालचिनी फायदेशीर ठरते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित दालचिनीचा आहारात समावेश करता येऊ शकतो.