कोरोनाची लागण : रुग्णांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी

देशात सध्या कोरोना व्हायरसचा फैलाव होत आहे.  मात्र, कोणीही घाबरुन जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले असून आरोग्य विभागाच्यावतीने मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आलीत.

Updated: Mar 13, 2020, 08:05 AM IST
कोरोनाची लागण : रुग्णांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोना व्हायरसचा फैलाव होत आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, कोणीही घाबरुन जाऊ नये. स्वत:ची व्यवस्थित काळजी घेतली तर त्यावर मात करता येते. जे परदेशातून प्रवास करुन आले आहेत, त्यांनी १४ दिवसांपर्यंत घरीच थांबावे, आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासामुळे अथवा त्या व्यतिरिक्त लागण झालेल्यांना सुयोग्य वैद्यकीय वातावरणात तातडीचे विलगीकरण अनिवार्य आहे. स्वतंत्र शौचालय तसचे वायुविजनाची सोय असलेल्या वेगळ्या खोलीमध्ये ठेवावे. या खोलीत कुटुंबातल्या दूसऱ्या सदस्याला राहावे लागल्यास किमान एक मिटरचे अंतर ठेवावे, असे आरोग्य विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

ही आहेत मार्गदर्शक तत्वे :

- कोरोना व्हायरस बाधित रूग्णाने ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, लहान मुले यांच्याशी संपर्क ठेऊ नये. 

सॅनिटायझर नसल्यास कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी सोपा उपाय

- तसेच कोरोना बाधित रूग्णाने कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला जाऊ नये. 

- अशा व्यक्तीने आपले हात वारंवार साबण आणि पाण्याने धूवावेत. किमान २० सेकंद हात चांगले साबणाने धुणे. 

- तसेच अल्कोहोल युक्त सॅनिटायझर वापरावेत. कोरोना व्हायरस बाधित व्यक्तीने सर्जिकल मास्क वापरावेत आणि दर सहा ते आठ तासांनी ते नष्ट करावेत.

- जर कुणाला खोकला, ताप, श्वसनात अडचण अशी लक्षणं आढळली तर त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रावर संपर्क साधावा.

- कोरोना व्हायरसची लक्षणे वाटू लागली तर त्याने जवळच्या आरोग्य केंद्रावर संपर्क  किंवा ०११२३९७८०४६ या हेल्पलाईन  नंबरवर संपर्क साधावा.

- घरातल्या विलगीकरणाचा कालावधी १४ दिवसांचा आहे, असेही या मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

शाळा-महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद

दरम्यान, करोना विषाणूचा फैलाव भारतात वाढत असून दिल्लीतही रुग्णांची संख्या वाढत आहे. यापार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दिल्लीतील चित्रपटगृहे तसेच शाळा-महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. दिल्लीत आजवर पाच करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.