भूक नसताना खाल्ल्यास होऊ शकते अँसिडिटी, अशी घ्या काळजी !

 गरज नसताना खाल्ल्याने अपचन होऊन पित्ताचा त्रास 

Updated: Aug 28, 2020, 03:07 PM IST
भूक नसताना खाल्ल्यास होऊ शकते अँसिडिटी, अशी घ्या काळजी ! title=

मुंबई : एखादा पदार्थ आवडत नाही म्हणून न खाणं किंवा एखादा पदार्थ आवडतोय म्हणून अतिप्रमाणात खाणं हे चुकीचं आहे. बऱ्याचदा अनेक जण आवड असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खातात, मग भूक असो किंवा नसो तरीही....पण भूक नसताना खाल्ल्याने ‘अँसिडिटी’ म्हणजेच ‘आम्लपित्ता’चा त्रास सतावू शकतो. कारण गरज नसताना खाल्ल्याने अपचन होऊन पित्ताचा त्रास होतो. त्यामुळे कोणताही पदार्थ खाताना तो प्रमाणात खाल्ला पाहिजे, असे वोक्हार्ट रूग्णालयाचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. रूचित पटेल यांनी सांगितले.

पित्त हा घटक मानवी शरीरासाठी अतिशय मह्त्त्वाचा असतो. पण सध्याच्या धकाधकीच्या आयुष्यात बदलती जीवनशैली, जेवणाच्या अनियमित वेळा, अपुरी झोपं, बदललेले आहाराचे स्वरूप यामुळे अपचन किंवा अँसिडिटीचा त्रास होणे हा अनेकांच्या दिनक्रमाचाच भाग बनला आहे. अँसिडिटी म्हणजे आम्लपित्त. जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल (आंबट द्रव) तयार होणे. हे आम्ल अन्न पचनासाठी अत्यंत आवश्यक असते. परंत, त्याच्या अति जास्त प्रमाणामुळे आम्लपित्त अथवा अँसिडिटीचा त्रास सुरू होऊ शकतो. वैद्यकीय भाषेला याला GERD (Gastro Esophageal Reflux Disease)  असे म्हणतात.

मळमळणे, डोके दुखणे, तोंडाची चव कडवट होणं, पोटात जळजळ होणं, छातीत आग होणं, डोळ्यांची जळजळ होणं, उलटी होणं, वारंवार आंबट कडू पाणी तोंडात येणं, अस्वस्थ वाटणं, करपट ढेकर येणं, चक्कर येणं आणि अंगाला खाज सुटणे, ही अँसिडिटीची प्रमुख लक्षणंही दिसून येतात.  

विशेषतः अगदी साधे जेवण आहारामध्ये घेतले तरी अँसिडिटीचा त्रास होत असल्याची तक्रार अनेक जण करतात. चुकीची आहार पद्धत आणि जेवणाच्या अनिश्चित वेळा हे यामागील मुख्य कारणं आहेत.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, तणावग्रस्त जीवनशैली, पौष्टिक आहार न घेणं, सामान्यपेक्षा जास्त वेगाने खाणे, भूक नसताना जास्त अन्न खाणे, व्यायामाचा अभाव, पुरेशी झोप न घेणं यामुळेही अपचनाचा त्रास उद्भवू शकतो. अँसिडिपवर वेळीच उपचार झाले नाहीत, तर पुढे त्याचे दुष्परिणाम गंभीर होऊ शकतात. उदा. पोटात अल्सर होणं, पित्ताशयात खडे होणं, यकृताशी संबंधित आजार होऊ शकतात. प्रतिबंधात्मक उपायांमध्ये आपण आपली दिनचर्य़ा नियमित ठेवली, तर त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. आपला स्वभाव रागीट अथवा खूप चिंता करणारा असा असल्यास त्यावर नियंत्रण आणावे. व्यसनांपासून सदैव दूर राहावे. तसेच फास्ट फूड, कोल्डड्रिंकचे सेवन टाळावेत.

अन्ननलिकेच्या खालच्या भागातील स्नायू(LOS) (Lower Esophageal Sphincter) ढिले होतात

यामुळे जठरातील पित्त(Acid) अन्ननलिकेमध्ये प्रवेश करते

हे आबंट पित्त अन्ननलिकेच्या भिंतीवर सतत घर्षण करते, यामुळे अन्ननलिकेला सूज येऊ लागले.

सूज आल्यानंतर संबंधित व्यक्तीमध्ये छातीत जळजळ होणं, ओटीपोटात दुखणं, घसा खवखवणं, मळमळ होणं, गिळण्यास त्रास जाणवणं आणि खराब ढेकरं येणं अशी लक्षणं दिसून येतात.

पित्ताचा त्रास टाळण्यासाठी उपाययोजना :

भूक नसल्यास विनाकारण खाणं टाळा

आहारात ताजी फळे, भाज्या आणि अन्नधान्याचा समावेश करा

भरपूर पाणी प्या

सोयाबीन, डाळी अशा फायबरयुक्त पदार्थ खा

कंटाळवाणेपणा किंवा एकाकीपणामुळे खाणे टाळा

जंकफुड किंवा उघड्यावरील मसालेदार पदार्थांचे सेवन टाळावेत

न खाल्ल्याने झोप लागत नसल्यास स्वतःचे मन वळवण्याचा प्रयत्न करा. जसे की, (झोपेपूर्वी टीव्ही पाहणे, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स वापरणं किंवा कँफिनेटेड पेय पिणं)

नियमित व्यायाम करा...(पोहणे, नृत्य, योगा, धावणं, एरोबिक्स किंवा जॉगिंग)

आपल्या जेवणात निरोगी घटकांचा समावेश असल्याचे सुनिश्चित करा.

खाल्ल्यानंतर लगेचच अंथरूणात झोपणं टाळा

मद्यपान आणि धूम्रपान यांसारख्या व्यसनापासून दूर रहा

कांद्याचा रस किंवा टोमॅटोचा रस पिऊ नका किंवा कच्चा कांदा देखील खाऊ नका.

जेवणाच्या वेळा निश्चित करा, रात्रीअपरात्री खाण्याची सवय टाळा

अँसिडिटीचं वेळीच निदान न झाल्यास...या समस्या उद्भवू शकतात

अन्ननलिकेला सूज
अन्ननलिकेच्या भिंतीवर जखमा, अल्सर,
अन्ननलिकेचे तोंड आकुंचन पावणे.
अन्ननलिकेचा कॅन्सर.
रक्तक्षय
या कारणास्तव अपचन किंवा अँसिडिटीचा त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घेणं आवश्यक आहे.