मुंबई : भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कांदा आणि टोमॅटोशिवाय काही भाज्यांचा विचारच केला जाऊ शकत नाही. भाज्यांची ग्रेव्ही वाढवण्यासाठी आणि आंबटगोड चव देणार्या टोमॅटोमध्ये अनेक गुणकारी घटकही आहेत. हृद्याचे कार्य सुरळीत ठेवण्यास आणि अनियमित रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहेत.
उच्च रक्तदाब किंवा हायपरटेंशनच्या समस्येवर वेळीच उपचार न केल्यास तसेच सतत चढ उतार होत असल्यास या समस्येलाआटोक्यात ठेवणं गरजेचे आहे. अन्यथा यामधून काही कार्डियोव्हस्क्युलर आजारांचा धोका बळावतो. पण टोमॅटोच्या सेवनामुळे हृद्यविकाराचा हा धोका कमी करण्यास मदत होते. असा निष्कर्ष अनेक संशोधनातून सामोरी आला आहे.
टोमॅटोमध्ये lycopene आणि beta-carotene यासारखे प्रभावी अॅन्टीऑक्सिडंट्स आढळतात. आहारात टोमॅटोचा समावेश केल्याने घातक, विषारी घटक बाहेर पडण्यास मदत करतात.
फ्री रॅडिकल्सचा धोका कमी होतो. रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासोबतच ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. यासोबतच टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ई घटक आढळतात. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट आणि पोटॅशियमचा मुबलक साठा असतो.या मिनरल्समुळे शरीरात फ्लुईड इलेक्ट्रोलाईटसचे प्रमाण संतुलित राखण्यास मदत होते.
रक्तदाबाची समस्या आटोक्यात ठेवण्यास टोमॅटो फायदेशीर ठरत असला तरीही गाऊटचा त्रास असणार्यांनी मात्र टोमॅटोचे सेवन टाळावे. इतर भाज्यांच्या रसासोबत किंवा सलाडमध्ये टोमॅटोचा वापर करू शकता.