मुंबई : आपले रोजचे जीवन हे अनेक तणावयुक्त गोष्टींनी भरलेले असते, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. तिकिटाच्या रांगेत वाट बघण्यापासून ते ट्रॅफिकमध्ये अडकणे या सगळ्याच गोष्टी त्रासदायक ठरतात. परंतु, प्रत्येकवेळी ताणाला तुमच्या वरचढ होऊ देऊ नका. काही सोप्या युक्त्यांनी त्यावर मात करा. दिवसभरात अगदी छोट्या छोट्या गोष्टींमुळे येणाऱ्या ताणावर मात करण्यासाठी काही सोप्या मेडिटेशन टीप्स.
ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर स्वाभाविकपणे तुम्हाला ताण येतो. थोडी चिडचिड देखील होते. विशेषतः जेव्हा ऑफिसला वेळेवर पोहचायचे असते नेमका तेव्हाच उशीर होतो. अशा वेळी ट्रॅफिककडे लक्ष देण्यापेक्षा तुमच्या कृतीकडे नीट लक्ष द्या. म्हणजे जर तुम्ही गाडी चालवत असाल तर त्याकडे नीट लक्ष द्या. मागे शांतपणे बसला असाल तर डोळे मिटा आणि श्वासाकडे लक्ष केंद्रीत करा. त्यामुळे ताण न येण्यास, चिडचिड न होण्यास मदत होईल.
ताण येणारे इमेल्स येणं हा आपल्या कामाचा एक भाग असतो. परंतु, अशा इमेल्सना रिप्लाय करण्यापूर्वी काही वेळ फनी व्हिडीओज बघा किंवा तुम्हाला हलकं, शांत वाटेल अशा गोष्टींचा विचार करा. त्यामुळे ई-मेलला रिप्लाय करण्याआधी तुमचा दृष्टिकोन स्पष्ट झालेला असेल.
गोड खाण्याच्या अतिरिक्त इच्छेमुळे काही वेळेस खूप ताण येतो. असे झाल्यास श्वास घ्या आणि दोन्ही हात वर उचला. श्वास सोडा आणि दोन्ही हात खाली करा. असे केल्याने तुमचे गोड खाण्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष होईल व त्यामुळे येणारा ताण नाहीसा होईल.
पार्टनरचा राग आल्यावर किंवा बोलण्याची इच्छा नसल्यास बालासन करा आणि काही वेळ त्याच स्थितीत रहा. तुम्ही ताबडतोब शांत व्हाल आणि पार्टनरशी बोलण्याची इच्छा होईल. भांडण्याच्या मध्ये खूप राग आल्यास ब्रेक घ्या. एखादं काम करा. म्हणजे आवराआवरी किंवा अंथरून घालणे. आणि मग पुन्हा संभाषणाला सुरवात करा.
झोप लागत नसल्यास पाठीवर झोपा आणि हात पोटावर ठेवा. आणि श्वासाबरोबर पोटाची होणारी हालचाल अनुभवा. श्वास घेताना पोट वर येतं आणि श्वास सोडताना पोट खाली जातं. शरीराचा प्रत्येक स्नायू रिलॅक्स करा. बघा तुमच्या नकळत तुम्हाला झोप लागेल.