मुंबई : मधुमेही रुग्णांच्या तब्येतीत चढ-उतार होत असतात, पण आरोग्य चांगलं ठेवायतं असेल तर काळजी घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही योग्य काळजी घेतली नाही तर उन्हाळ्याच्या दिवसात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकणार नाही. मधुमेहाच्या रुग्णांनी या ऋतूत आहारात बदल करावा. जाणून घेऊया त्यांनी आहारात नेमका कोणत्या पदार्थांचा समावेश करावा.
उन्हाळ्यापासून आराम मिळवण्यासाठी अनेकजण टेट्रापॅकमधील ज्यूस पितात. पण त्यात साखरेचे प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे त्याचं सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. ताज्या फळांचा रस घरी काढा आणि तो प्या. ज्यामध्ये नैसर्गिक साखर कमी असते.
मधुमेही रुग्णांनी दिवसाची सुरुवात खाण्याच्या चांगल्या पद्धतीने केली तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. नाश्त्यामध्ये असे पदार्थ खाणं आवश्यक आहे, ज्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असेल. असं केल्यास पुन्हा पुन्हा भूक लागत नाही. तुमच्या नाश्त्यामध्ये ओट्स, ओटमील, सफरचंद, बेरी यासारख्या गोष्टींचा समावेश करा.
कडक ऊन, उष्ण वारा आणि आर्द्रता यामुळे उन्हाळ्यात शरीरातून भरपूर घाम येतो, त्यामुळे स्वत:ला हायड्रेट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अन्यथा मधुमेही रुग्णांना पाण्याअभावी चक्कर येणं, अशक्तपणाचा सामना करावा लागू शकतो.