मुंबई : शुक्रवारी अनेकांच्या घराघरात गणपती विराजमान झाले आहे. गणेशोत्सव आणि येणाऱ्या काही सणांमुळे गर्दी जमण्याची शक्यता आहे. दरम्यान या जमणा-या गर्दीबाबत आरोग्य तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिलाय. कोरोनाच्या काळात ही गर्दी संक्रमण वाढवू शकते.
गणपती तसंच येणाऱ्या सणांमुळे गर्दीमध्ये वाढ होऊन कोरोनाचा उद्रेक होऊ शकतो असं आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे. सध्या देशातील अनेक भागात पुन्हा एकदा कोरोना संसर्गामध्ये वाढ झाली असल्याचं चित्र आहे.
येत्या काळात सण असून गर्दी होण्याची शक्यता आहे. अशा काळात निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा गंभीर स्थिती उद्भवू नये यासाठी सर्व तज्ञ मंडळी खबरदारी घेण्याचा सल्ला देतायत. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल इशारा देताना म्हणाले की, “जर आपण आता थोडीशी जरी चूक केली तरी सध्या नियंत्रणात असलेला संसर्ग पुन्हा मोठं आणि भयंकर रूप धारण करू शकतो. यामुळे आतापर्यंत केलेली सर्व मेहनत व्यर्थ जाईल.”
पॉल पुढे म्हणाले की, अजूनही दुसरी लाट संपलेली नाही. त्यामध्येच आता सणासुदीचे दिवस येत आहेत. अशात मोठ्या संख्येत लोकांनी जमाव करू नये. आजही मोठी लोकसंख्या कोरोना संसर्गापासून सुरक्षित आहे. सर्वांच्या हितासाठी आपण सण घरातच साजरे केले पाहिजे.
लसीकरणासाठी महिलांना पुढे येण्याचं आवाहन डॉपॉल यांनी केलं आहे. ते म्हणाले की, “महिलांच्या लसीकरणाचा आकडा आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी आहे. गर्भवती महिलांसाठी कोरोना लस अत्यंत महत्वाची आहे.”
“ज्यांनी ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी दुसरा डोस देखील वेळेत घ्यावा.” असंही ते म्हणालेत.