Corona : कोरोनापासून सावधान! महिन्याभरात 60 हजार लोकांना गमवावा लागला जीव

8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान कोविड संबंधित आजारांमुळे एकूण 59,938 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Updated: Jan 14, 2023, 08:53 PM IST
Corona : कोरोनापासून सावधान! महिन्याभरात 60 हजार लोकांना गमवावा लागला जीव title=

Corona In china : नवं वर्ष येण्याअगोदरच चीनमध्ये कोरोनाच्या (China in Corona) ओमायक्रॉन सब-व्हेरिएंटने थैमान घातलं होतं. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनच्या (National Health) वैद्यकीय प्रशासन ब्युरोचे प्रमुख जिओ याहुई (Jiao Yahui) यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, चीनमध्ये गेल्या एका महिन्यात कोरोनाशी संबंधित आजारांमुळे तब्बल 60,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. जिओ यांनी, पत्रकार परिषदेत सांगितलं की, 8 डिसेंबर 2022 ते 12 जानेवारी 2023 दरम्यान कोविड संबंधित आजारांमुळे चीनमध्ये एकूण 59,938 लोकांचा मृत्यू झाला.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या वैद्यकीय व्यवहार विभागाचे संचालक जिओ याहुई (Jiao Yahui) यांनी सांगितले की, चीनमध्ये कोविड संसर्गामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे 5,503 मृत्यूची नोंद झाली आहे. त्याच वेळी कोविडशी (corona 19) संबंधित इतर आजारांमुळे 54,435 लोकांचा मृत्यू झाला आहे..

समोर आलेल्या अधिकृत आकडेवारीमध्ये, मृतांचा आकडा 60 हजार सांगितला जात असला तरीही प्रत्यक्षात मात्र ही आकडेवारी अधिक जास्त असण्याची शक्यता आहे. ऑगस्ट 2022 मध्ये चीनने कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या संख्येची मोजणी करण्याची पद्धत बदलली होती. ही पद्धत जागतिक आरोग्य संघटनेने दिल्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.

चीनमध्ये, कोरोना संसर्गाने (Corona infection) मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्येत केवळ श्वसनाचे आजार आणि न्यूमोनियामुळे मृत्यूची भर पडताना दिसतेय. एका पोस्टनुसार, 90 टक्के मृत्यू 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये झाले असून सरासरी वय 80 वर्षे इतकं आहे.

कोरोनासंबंधीचा डेटा जाहीर न केल्याने चीनवर जगभरातून टीका होताना दिसत होती. यामुळे अनेक देशांनी चीनमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदीही घातली होती. ज्यानंतर झिरो कोविड पॉलिसी मागे घेतल्यानंतर चीनने प्रथमच कोविड बुलेटिन (covid bulletin) जारी केलंय.

10 लाखांपेक्षा जास्त मृत्यूंची शक्यता

तज्ज्ञ एरिक फिगेल डिंग यांच्या सांगण्यानुसार, कोरोनाच्या या लाटेमध्ये दहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता आहे. तर काही आरोग्य तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येत्या काही महिन्यात चीनच्या 60% आणि जगातील 10% लोकसंख्येला संसर्ग होऊ शकतो.

अमेरिका आणि जपानमध्येही थैमान

हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या मताप्रमाणे, अमेरिकेमध्ये आतापर्यंत कोरोनाचे 100 दशलक्षाहून अधिक प्रकरणं समोर आलीयेच. तर अमेरिकेमध्ये आतापर्यंत 10 लाख 88 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. जपानमध्येही कोरोना निर्बंध उठवल्यापासून प्रकरणं वाढत असल्याचं समोर आलं आहे.