कोरोना पसरतोय; सरकार काय नवी पावलं उचलणार?

भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतायत

Updated: Jan 5, 2022, 07:59 AM IST
कोरोना पसरतोय; सरकार काय नवी पावलं उचलणार? title=

ब्रिटन : कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा झोप उडवली आहे. भारतासह अनेक देशांमध्ये कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसतायत. ब्रिटनमध्येही परिस्थिती बिकट आहे मात्र तरीही तिथलं सरकार कडक निर्बंध लावण्याच्या विचारात नाही. मंगळवारी या ठिकाणी दोन लाख रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सतत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय.

कोरोनाची प्रकरणं वाढत असताना पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी लॉकडाऊन जाहीर करणार नसल्याचं सांगितलं. 

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा वेग वाढला आहे. ज्याप्रकारे रूग्णसंख्या वाढतेय त्यानुसार तज्ज्ञांनी कठोर नियम लागू करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ब्रिटन सरकार सध्या कठोर नियम लावण्याच्या तयारीत नाही. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी मंगळवारी सांगितलं की, इंग्लंड आर्थिक गोष्टी बंद न करता कोविडचा संसर्ग नियंत्रणात आणण्याच्या विचारात आहे.

बूस्टर डोस आणि खबरदारी घेणं पुरेसं

पंतप्रधान जॉन्सन यांनी इंग्लंडमध्ये लॉकडाऊन लावण्यास विरोध केला आहे. ते म्हणाले, लसीचा बूस्टर डोस आणि लोकांना सावधगिरी बाळगण्यासाठी जागरूक करणं पुरेसे आहे. यूकेमध्ये मंगळवारी 2,18,724 नवीन कोरोनाची प्रकरणं नोदवण्यात आली. 

ब्रिटनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ख्रिस व्हिटी म्हणाले की, कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने मृत्यूचं प्रमाण वाढलेलं नाही. त्यामुळे सध्या सरकार लॉकडाऊनसारख्या उपाययोजनांकडे पाहत नाही. 

पंतप्रधान जॉन्सन म्हणाले की, आयसीयूमध्ये दाखल असलेल्या 60 टक्के रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही. जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून संसर्ग पसरण्याची शक्यता कमी करता येईल.