आता, 'कोका-कोला'चं कैरी पन्हं आणि ताकही बाजारात

गेल्या काही वर्षांपासून या पेय पदार्थांचीच मागणी वाढताना दिसत आहे

Updated: Mar 29, 2019, 02:03 PM IST
आता, 'कोका-कोला'चं कैरी पन्हं आणि ताकही बाजारात title=

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरुकता वाढल्यामुळे कोल्ड ड्रिंक कंपन्यांची झोप उडालीय. त्यामुळेच अनेक सॉफ्ट ड्रिंक कंपन्यांनी आपली बाजारातील रणनीती बदलण्याचा निर्णय घेतलाय. नव्या योजनेनुसार, कोका-कोलासहीत अनेक दिग्गज कंपन्या दोन हजार वर्षांपासून आरोग्यदायी अशा घरगुती पेयांकडे वळलेल्या दिसत आहेत. यानुसार, आता तुम्हाला बाजारात 'कोका-कोला'चे जलजीरा, कैरी पन्हं आणि ताक पाहायला मिळालं, तर आश्चर्य वाटू देऊ नका. उन्हाळ्याची दाहकता तसंच वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनीनं कैरीचं पन्हं पुरवण्याचा निर्णय घेतलाय. 

यापूर्वी, समोर आलेल्या अनेक अहवालामध्ये कोल्ड ड्रिंक पिणं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरल्याचं समोर आलंय. अशा वेळी अनेक वापरकर्त्यांनी कोल्ड ड्रिंक बाजुला सारलंय. परंतु, कैरी पन्हं आणि जलजीरा घरगुती मसाले आणि फळांपासून तयार केलं जातं. त्यामुळे त्याचा आरोग्यासाठी ते फायदेशीरच ठरणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या पेय पदार्थांचीच मागणी वाढताना दिसत आहे. एका अहवालानुसार, ही मागणी कोल्ड ड्रिंकच्या तुलनेत तिप्पट आहे.

फळांच्या रसाची वाढती मागणी

'ब्लूमबर्ग'च्या अहवालात, देशातील २९ राज्य कंपनीसाठी २९ देशांच्या बरोबरीत आहेत. इथं काही किलोमीटर अंतरावर बोलीभाषा आणि खाद्यपदार्थांत बदल दिसून येतो असं कोकचे भारतातील कार्यकारी अधिकारी टी कृष्णकुमार यांनी म्हटलंय. 

भारतात छोटे-छोटे स्टार्टअप जलजीरा आणि कैरी पन्ह्याची विक्री करत आहेत. मागणीत वाढ लक्षात घेता त्यांचंच अनुकरण करत कोका-कोला कंपनीनं अगोदरच जलजीरा बाजारात लॉन्च केलाय. आता कंपनीकडून कैरी पन्हंही बाजारात येतंय.

भारतात गुंतवणूक

कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतात ज्युस मार्केट ३.६ अरब डॉलरचा आहे. यासाठी कंपनीकडून आंबा आणि लिचीचं उत्पादनही सुरु करण्यात येणार आहे. यासाठी कंपनी भारतात १.७ अरब डॉलरची गुंतवणूक करणार आहे.