डिमेंशियाग्रस्त अटलजी ; हा आजार टाळण्यासाठी नेमके काय करावे?

 भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे काल निधन झाले.

Updated: Aug 17, 2018, 02:32 PM IST
डिमेंशियाग्रस्त अटलजी ; हा आजार टाळण्यासाठी नेमके काय करावे? title=

मुंबई : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे काल निधन झाले. एम्स रुग्णालयात त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांना किडनी आणि युरीन इंफेक्शनचा त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शरीरातून मूत्रविसर्जनाच्या कार्यामध्ये अडथळा येत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. 2000 साली अटलबिहारींच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करुन वाटी बदलण्यात आली होती. त्यामुळे कालांतराने त्यांच्या हालचालींवर बंधने आली होती. त्यांना मधुमेह होता आणि एकच किडनी काम करत होती. इतकंच नाही तर हळूहळू त्यांना विस्मृतीचा आजार जडला होता. विस्मृती म्हणजेच डिमेंशिया. तर अधिक जाणून घेऊया डिमेंशियाबद्दल...

डिमेंशिया एक अवस्था आहे. यामध्ये माणसाची स्मृती कमजोर होते. त्याचबरोबर निर्णय घेण्याची क्षमता पूर्णपणे प्रभावित होते. काहीही लक्षात ठेवणे कठीण होते. यावर कोणतेही औषधं उपलब्ध नाही. त्यासाठी संतुलित जीवनशैली अंगिकारणे गरजेचे आहे. 

संतुलित आहार

एका संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की, हेल्दी आहारा घेतल्याने डिमेंशियाचा धोका कमी होऊ शकतो. यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, धान्यं यांचा समावेश करा. याशिवाय मेंदूचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आहारात व्हिटॉमिन बी १२, व्हिटॉमिन सी, व्हिटॉमिन ई आणि फोलेट यांचा समावेश करा.

व्यायाम

नियमित व्यायाम करण्याची सवय लावून घ्या. यामुळे मेंदूचे आरोग्य व कार्य सुरळीत राहते. त्याचबरोबर डिमेंशिया होण्याचा धोका कमी होतो. कार्डिओवस्कुलर व्यायाम म्हणजेच चालणे, धावणे, पोहणे अशा प्रकारचा व्यायाम केल्याने नक्कीच फायदा होईल. नियमित व्यायामामुळे ब्लड पंपिंगचे कार्य सुरळीत होते आणि मेंदूला रक्ताचा योग्य पुरवठा होतो. 

सामाजिक संबंध

मिळून मिसळून राहिल्याने, सामाजिक संबंध उत्तम असल्यास डिमेंशियाचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे कुटुंबातील लोकांशी, मित्रांशी मिळून मिसळून राहा. कारण सामाजिक संबंधांचा शारीरिक-मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी ते उत्तम असते.