फॅटी लिव्हर आजार बनतेय धोक्याची घंटा, जाणून घ्या

यकृतामध्ये प्रमाणापेक्षा अधिक चरबी निर्माण होते

Updated: Jul 27, 2020, 08:24 PM IST
फॅटी लिव्हर आजार बनतेय धोक्याची घंटा, जाणून घ्या  title=

मुंबई : बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चूकीच्या सवयींमुळे योग्य नियंत्रण नसल्यानं कित्येक आजारांना निमंत्रण मिळते. याच गंभीर आजारांपैकी एक म्हणजे फॅटी लिव्हर (Fatty Liver). वेळीअवेळी खाण्यापिण्याच्या सवयींमुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवू शकते. यकृत  खराब झाल्यास संपूर्ण शरीरातील प्रक्रियांवरही दुष्परिणाम होतो. आपले यकृत अन्नपदार्थ पचवण्यासाठी मदत करते आणि संपूर्ण शरीराला ऊर्जा देण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करतं. पण एखाद्या व्यक्तीच्या यकृतामध्ये प्रमाणापेक्षा अधिक चरबी निर्माण झाल्यास या समस्येस फॅटी लिव्हर असं म्हटलं जातं. नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज यामध्ये यकृतामध्ये चरबी जमा झालेली असते.

यकृतामध्ये चरबी वाढते तेव्हा फॅटी लिव्हर ज्याला हेपॅटिक स्टेटोसिस देखील म्हणतात. आपल्या यकृतामध्ये जास्त चरबी निर्माण होणे अतिशय गंभीर आहे. जेव्हा मद्यसेवन न करणा-या व्यक्तीमध्ये फॅटी लिव्हर विकसित होते तेव्हा त्याला नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) होतो. हे बदलती जीवनशैली, लठ्ठपणा आणि इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होते. यामुळे हेपेटायटीस देखील होऊ शकते आणि एखाद्याच्या यकृतास कायमचे नुकसानही करू शकते.

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज आणि मेटाबोलिक सिंड्रोम  जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एक्सपेरिमेंटल हिपॅटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या आकडेवारीनुसार भारतात नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज 25 दशलक्ष रूग्ण आहेत ज्यांना यकृतच्या गंभीर आजाराचा धोका असू शकतो. भारतात याचे प्रमाण 9% ते 35% इतके आहे. तर मुंबईत हे प्रमाण १६.६ आणि  ४९ टक्के मधुमेहाच्या रुग्णांना फॅटी लिव्हरचा आजार असल्याचे सांगितले जाते. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) हा चयापचय सिंड्रोमशी संबंधित आहे. मधुमेह इन्शूलिनच्या कमतरतेमुळे रक्तामध्ये व लघवीमध्ये साखर आढळणे, लठ्ठपणा इत्यादींसह चयापचयाशी संबंधी समस्या याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

अपोलो स्पेक्ट्रा मुंबईचे पोटविकार तज्ञ डॉ. केयुर शेठ सांगतात, “एनएएफएलडीला सायलेंट किलर म्हणून ओळखले जाते हा रोग अनुवांशिक आहे आणि मेटॅबोलिक सिंड्रोमचा एक भाग आहे ज्यामध्ये जास्त वजन, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, कोलेस्ट्रॉलची समस्या आणि थायरॉईड असलेल्या रूग्णांचा समावेश आहे. एनएएफएलडीमुळे हिपॅटायटीस, लिव्हर सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोग होतो.

झेन मल्टिस्पेशॅलिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. रॉय पाटणकर म्हणतात, "चरबीयुक्त यकृत म्हणजे तुमच्या यकृतात अतिरिक्त प्रमाणात चरबी आहे. त्याला 'सायलेंट किलर' असेही म्हटले जाते. दोन प्रकारचे चरबीयुक्त यकृताचे आजार असतात -  नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) आणि अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (अल्कोहोलिक स्टिटोपेहटाटिस). सध्याच्या काळात जीवनशैली आणि आहाराच्या सवयींमुळे तरुण वयातील व्यक्तींना हा चरबीयुक्त यकृताचा आजार जडत आहे. त्यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर हा आजार प्राणघातक ठरू शकतो.

निरोगी जीवनशैली, व्यायाम, वजन कमी आणि पौष्टिक आहारासह आपली जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न करा. ताजी फळे, भाज्या, शेंगा आणि सर्व प्रकारचे धान्य यांचा आहारात समावेश असू द्या.  कार्बोहायड्रेट्स, मिठाई, ट्रान्स फॅट्स आणि अल्कोहोलच्या वापरावर मर्यादा घाला. आपल्या रक्तातील साखर, ट्रायग्लिसेराइड पातळी आणि कोलेस्टेरॉलची पातळीचे व्यवस्थापन करा. तसेच हिपॅटायटीस आणि यकृत खराब होण्यापासून बचाव करण्यासाठी काही औषधे एनएएफएलडी रुग्णांना दिली जाऊ शकतात.