मुंबई : जगभरात 15 मार्च हा दिवस 'वर्ल्ड स्लीप डे' म्हणून साजरा केला जातो. या वर्षी 'वर्ल्ड स्लीप डे'ची थीम 'हेल्दी स्लीप आणि हेल्दी एजिंग' आहे. 'वर्ल्ड स्लीप डे' साजरा करण्यामागे लोकांना 7 ते 8 तास पुरेशी झोप घेतल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत जागरूक करणे हा उद्देश आहे. झोपण्यामुळे केवळ दिवसभराचा थकवा दूर होत नाही तर मन आणि मेंदूही शांत राहतो. झोप पूर्ण न झाल्याने हृदयाचे आजार, स्ट्रोक, ब्लड प्रेशर, मधुमेह, वजन वाढणे यांसारखे आजार होऊ शकतात. वाढलेले वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएटसह पुरेशी झोपही तितकीच महत्त्वाची आहे.
बदलती जीवनशैली आणि दररोजच्या स्पर्धेच्या जगात धावत असताना कमी झोप घेणे माणसाला रोगी बनवत आहे. सतत कॉम्प्युटर आणि मोबाईलचा वापर युवकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करत आहे. अनेकजण झोप न येण्याच्या आजाराने त्रस्त आहेत. 16 ते 30 वर्षापर्यंतचे तरूण या आजाराने सर्वाधिक त्रस्त आहेत. अनेक तरूण व्हिडिओ गेम, सतत मोबाईलच्या वापराने झोप पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिले जात आहे. झोप पूर्ण न झाल्यास शारीरिक आजारासह मानसिक आजारही बळावत आहेत.
कमी झोप घेतल्याने शरीरातील घ्रेलिन आणि लेप्टिन हार्मोन्सवर परिणाम होतो. शरीरातील घ्रेलिन हार्मोन्समुळे अधिक भूक लागते. हे हार्मोन मेटाबॉलिज्मला कमजोर करते आणि शरीरात अधिक फॅट जमा करतात. लेप्टिन हार्मोनही वजन वाढवण्याचे काम करतात. झोप पूर्ण न झाल्याने शरीरात लेप्टिन हार्मोनचा स्तर कमी होतो तर घ्रेलिन हार्मोनचा स्तर वाढतो. त्यामुळे अधिक भूक लागते. परिणामी जास्त खाण्यामुळे वजन वाढते.
पुरेशी आणि योग्य झोप व्यक्तीची निर्णयक्षमता, स्मरणशक्ती आणि सर्जनशीलता वाढवते. झोप पूर्ण झाल्याने मेंदू सुरळित काम करतो. थकवा दूर होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढते. अनेक आजारांपासून बचाव होतो.
- आरोग्यदायी आणि उत्तम स्वास्थासाठी 7 ते 8 तास झोप घ्या.
- रिकाम्या पोटी झोपू नका.
- झोपण्याच्या आणि खाण्याच्या वेळेत 1 ते 2 तासांचे अंतर ठेवा.
- झोपण्याआधी कोणतेही व्यसन करू नका.
- झोपण्याचे ठिकाण आरामदायी आणि शांतता असावी.