World Breastfeeding Week : अभिनेत्रीला का करावं लागतंय सलग 2728 व्या दिवशीही स्तनपान

सलग सात वर्षांपासून ती असं करत आलीये....   

Updated: Aug 4, 2021, 04:59 PM IST
World Breastfeeding Week :  अभिनेत्रीला का करावं लागतंय सलग 2728 व्या दिवशीही स्तनपान  title=
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

World Breastfeeding Week : यंदाच्या वर्षी 1 ते 7 ऑगस्ट या सप्ताहादरम्यान (World Breastfeeding Week) अर्थात जागतिक स्तनपान सप्ताह आहे. यादरम्यान, स्तनपानाशी संबंधित अनेक वृत्त, छायाचित्र आणि बरीच माहिती सर्वांच्या भेटीला आणी जात आहे. स्तनपानाकडे पाहण्याचा एक व्यापक दृष्टीकोन या माध्यमातून मिळत आहे. याच सप्ताहादरम्यान, एका अभिनेत्रीनं तिच्या गरोदरपणाचे, स्तनपानाचे अनुभव सर्वांशी शेअर केले आहेत. 

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत या अभिनेत्रीनं आपला स्तनपान करण्याचा अनुभव सर्वांशी शेअर केला. ही अभिनेत्री आहे टेरेसा पामर. ऑस्ट्रेलियन अभिनेत्री टेरेसा ही सध्या गरोदर आहे. ती चौथ्यांदा गरोदर असून, जवळपास गेल्या सात वर्षांहून अधिक काळापासून ती स्तनपान करत आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत 2014 मध्ये आई झाल्यापासून आपण आजच्या दिवसापर्यंत स्तनपान करत असल्याचं सांगितलं. 

35 वर्षीय टेरेसानं मुलांसोबतचे फोटो शेअर करत लिहिलं, 4 ऑगस्ट या दिवशी स्तनपान करण्याला तब्बल 2728 दिवस पूर्ण होत आहेत. पहिल्या मुलानंतर दुसऱ्या बाळंतपणापर्यंत पहिल्या बाळाला आपण स्तनपान करतच होतो, यानंतर हा सिलसिला असाच सुरु होता असं टेरेसानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं. अनेकदा या प्रक्रियेमध्ये आपण थकतो पण कित्येकदा मुलं सोबत असल्याचं पाहून एक आभाराचीच भावना मनात घर करुन जाते असंही तिनं पोस्टमध्ये लिहिलं. 

मुलांना स्तनपान करण्याची संधी मिळाली ही अतिशय मोठी बाब आहे, कारण हे प्रत्येकालाच शक्य होत नाही. असं म्हणत आपण आनंद व्यक्त केला पाहिजे की कोणतेही पूर्वग्रह न बाळगता कोणत्याही परिस्थितीत महिला त्यांच्या मुलांचं पोषण करतात, असा सुरेख विचार तिनं पोस्टच्या माध्यमातून मांडला. लोक काय म्हणतील याचा विचार न करता ज्या महिलांना स्तनपान करण्याची संधी मिळाली आहे त्यांनी ते करावं, मनात कसलीही भीती बाळगू नये अस संदेश तिनं दिला आहे. 

स्तनपान हे बाळासाठी आणि त्याच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही. तर, गरज आहे ती म्हणजे याबाबत असणारा न्यूनगंड आणि काही पूर्वग्रह दूर करण्याची.