Entertainment News : कपूर कुटुंबाभोवती असणारं प्रसिद्धीचं वलय सर्वांनाच माहितीये. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून हे कुटुंब कलाजगतामध्ये प्रकाशझोतात आलं. पुढे राज कपूर आणि त्यानंतर पुढच्या पिढीनं कुटुंबाचा वारसा पुढे नेला. सध्या रणबीर कपूर, करिना कपूर ही मंडळी कुटुंबानं जोपासलेली कला पुढे नेताना दिसत आहेत. अशा या कुटुंबातील एक प्रेमप्रकरण नुकतंच समोर आलं आहे.
एका यशस्वी अभिनेत्रीनं फार कमी वयातच जीवापाड प्रेम असतानाही कपूर कुटुंबातील मुलाचं अर्थात एका अभिनेत्याचं लग्नाचं प्रपोजल नाकारलं होतं. ती अभिनेत्री तेव्हा अवघी 17 वर्षांची होती. तिचं नाव माहितीये? आपल्या अदा आणि स्टाईल स्टेटमेंटनं तेव्हाचा काळ गाजवणारी ही अभिनेत्री होती मुमताज.
मुमताज यांनी त्या काळात अभिनेता शम्मी कपूरच्या लग्नाच्या मागणीला नकार दिला होता. त्यांचं शम्मी यांच्यावर प्रेम नव्हतं अशी बाबत नाही. जंगली या चित्रपटाच्या सेटवर ज्यावेळी मुमताज यांनी शम्मी कपूर यांना पाहिलं होतं तेव्हाच त्या भारावल्या होत्या. पुढं नियतीच्या मनातही असंच काहीसं होतं, कारण ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडली. आता लग्न होणारच हेसुद्धा निश्चित झालं, कारण खुद्द शम्मी कपूर यांनी मुमताज यांना लग्नाची मागणी घातली होती.
'ब्रह्मचारी' या चित्रपटामध्ये शम्मी कपूर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या मुमताज हल्लीच एका मुलाखतीत गतकाळाविषयी मोकळेपणानं बोलल्या. 'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे...' या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान आपण प्रेमात पडल्याची कबुली त्यांनी दिली. साधारण दोन वर्षे हे नातं सुरु राहिलं. मुमताज यांच्या माहितीनुसार हे नातं सुरु होण्याच्या काही दिवसांपूर्वीच शम्मी कपूर यांच्या पत्नी, गीता बाली यांचं निधन झालं होतं.
पत्नीच्या निधनातून खचलेले शम्मी कपूर कामात व्यग्र झाले आणि याच कलाजगतामध्ये त्यांना मुमताज यांची साथ मिळाली. त्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. किंबहुना शम्मी यांनी प्रेम व्यक्त करत मुमताज यांना लग्नाची मागणी घातली. पण, इथं नात्याचं समीकरण बदललं. कारण, मुमताज यांनी लग्नास नकार दिला होता.
कपूर कुटुंबात लग्न करून सून म्हणून जाणाऱ्या महिलांना कलाजगतामध्ये काम करण्याची परवानगी नाही असा अलिखित नियमच तेव्हा या सेलिब्रिटी कुटुंबात लागू होता. मुमताज यांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारत आपण आपली स्वप्न साकारण्यासाठी पुढंही काम करु इच्छितो असं कारण पुढे केलं. 'मला त्याच्या मुलांची काळजी घेणारी, घर सांभाळणारी गृहिणी व्हायचं नव्हतं', असं मुमताज म्हणाल्या. हा नकार शम्मी यांना पचवता आला नाही, 'तुझं माझ्यावर खरं प्रेम असतं तर तू लग्नासाठी होकार देऊन चित्रपटांमध्ये काम करणं थांबवलं असतंस, तू फक्त प्रेम करण्याचं नाटक केलंस कारण, तुला मोठ्या संधी हव्या होत्या' अशा शब्दांत त्यांनी मुमताज यांना सुनावलं. प्रेमाच्या माणसानं असं काही बोलणं मुमताज यांचं मानसिक खच्चीकरण करून गेलं. पुढे याच मुमताज यांनी मयुर माधवानी यांच्याशी लग्नगाठ बांधत आयुष्यातील एक नवा अध्याय सुरु केला.