मुंबई : आयपीएल बेटिंग प्रकरणी अभिनेता आणि सलमान खानचा भाऊ अरबाज खानची ठाणे पोलिसांनी चौकशी केली. आयपीएलमध्ये सट्टेबाजी केल्याचं अरबाज खाननं कबूल केलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सट्टेबाजीमुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. माझ्यावरची उधारी वाढत गेली. सट्टा जिंकून मला जुनी उधारी चुकती करायची होती. पण सट्ट्यामध्ये मला अपयश येत होतं, असं अरबाज खान चौकशीत म्हणाला. अरबाज आणि मलायका अरोराच्या घटस्फोटालाही अरबाजची ही सवय जबाबदार असल्याची माहिती आता समोर येत आहे. अरबाजच्या या सवयीमुळे सलमान खानही त्याच्यावर बराच भडकला होता. दोघांच्या भांडणामध्ये कुटुंबाला मध्यस्ती करावी लागल्याचं सूत्रांनी सांगितलं.
अरबाज खानच्या सट्टा लावण्याच्या सवयीमुळे सलमान खान हैराण झाला होता. सलमाननं अनेकवेळा अरबाज खानला समजवलं देखील होतं. पण अरबाजची सवय सुटत नव्हती. सट्टेबाजी केल्यामुळे अरबाजवरची उधारी दिवसेंदिवस वाढत चालली होती. रक्कम वाढत चालल्यामुळे सट्टेबाज अरबाजला फोन करायचे पण अरबाज कोणताही रिप्लाय द्यायचा नाही. त्यामुळे सट्टेबाज मलायकाला फोन करायचे. यामुळे मलायकाही हैराण झाली आणि अरबाज-मलायकामध्ये भांडणं वाढायला लागली. अरबाजच्या या सवयीची माहिती सलमानला कळली तेव्हा त्याला राग आला होता. अरबाजला थप्पड मारण्यासाठी सलमान पुढे सरसावला होता पण कुटुंबातील सदस्या मधे पडले आणि सलमानला रोखलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरबाजची सट्टेबाजीची सवय सोडवण्यासाठी मलायकानं खूप प्रयत्न केले. पण अरबाजवर याचा काहीही परिणाम झाला नाही. शेवटी तिनं अरबाजपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
आयपीएलमध्ये सट्टेबाजीप्रकरणी ठाणे पोलिसांनी अरबाज खानची चौकशी केली. क्राईम ब्रांचच्या तीन अधिकाऱ्यांनी अरबाजला प्रश्न विचारले. चौकशी सुरु असताना सट्टेबाज सोनू जलान आणि अरबाज खानना समोरासमोर बसवण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार दोघांना ७ मिनीटं समोरासमोर ठेऊन चौकशी करण्यात आली. यावेळी अरबाजनं सट्टा लावल्याचं कबूल केलं.