पंतप्रधानपदी असताना लाल बहादूर शास्त्री यांनी मीना कुमारी यांची माफी मागितली होती, प्रसिद्ध झाला होता किस्सा

'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या मीना कुमारी यांनी आपल्या स्टाईलने लाखो लोकांच्या मनावर राज्य केलं. 

Updated: May 7, 2021, 04:35 PM IST
पंतप्रधानपदी असताना लाल बहादूर शास्त्री यांनी मीना कुमारी यांची माफी मागितली होती, प्रसिद्ध झाला होता किस्सा title=

मुंबई : 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून प्रसिद्ध असलेल्या मीना कुमारी यांनी आपल्या स्टाईलने लाखो लोकांच्या मनावर राज्य केलं. चित्रपटात त्यांचा चमकदार अभिनय बघण्यासाठी लोक गर्दी करत. मीना कुमारी यांच्या बद्दल बर्‍याच कथा आहेत. त्यांच्या लहानपणापासून ते चित्रपटांपर्यंतचा प्रवास, लव्हस्टोरी ते विवाहित जीवनापर्यंत ते दारूच्या व्यसनापर्यंतच्या प्रवासात मीना कुमारी यांनी खूप काही सहन केलं आहे. यामुळेच लोकं त्यांना 'ट्रेजिडी क्वीन' म्हणून बोलावू लागले. पण त्यांचा एक किस्सा देखील आहे. जो बर्‍यापैकी प्रसिद्ध झाला. देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी अभिनेत्री मीना कुमारी यांची माफी मागितली होती.

मीना कुमारी यांनी १९३९ ते १९७२ या काळात चित्रपटात भूमिका साकारल्या. तो त्यांचा सुवर्णकाळ होता. सगळीकडे मीना कुमारी यांचा बोलबाला होता. त्यांचे चित्रपट चित्रपटगृहात हिट व्हायचे. मात्र यानंतरही देशाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी मीना कुमारी यांना ओळखलं नाही.

खरंतर लाल बहादूर शास्त्री यांना 'पाकीजा' चित्रपटाचं शूटिंग पाहण्यासाठी मुंबईतील एका स्टुडिओत बोलावलं होतं. महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून त्यांना निमंत्रण होतं त्यामुळे त्यांना टाळताही येत नव्हतं, ते नाही म्हणूच शकले नाही आणि शूटिंग पाहण्यासाठी स्टुडिओत पोहोचले.

कुलदीप नायर यांनी आपल्या 'ऑन लीडर्स अँड आइकॉन: फ्रॉम जिन्नाह टू मोदी'  या पुस्तकात असं लिहिलं आहे की, 'त्यावेळी तिथे बरीच मोठी स्टार मंडळी हजर होती. मीना कुमारी यांनी लाल बहादूर शास्त्री यांना पुष्पहार घातला. शास्त्री जी यांनी मला अतिशय विनम्रतेने विचारलं - 'या महिला कोण आहेत?'  मी त्यांना सांगितले की, 'मीना कुमारी'.

कुलदीप नायर यांनी पुढे असं लिहिलं की, 'शास्त्री जी ही गोष्ट सार्वजनिकपणे विचारतील असे मला कधी वाटलं नव्हतं. मात्र, शास्त्रींच्या या भोळेपणाने आणि प्रामाणिकपणावर मी  प्रभावित झालो. नंतर लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या भाषणात म्हणाले,  मीना कुमारी जी, मला माफ करा. मी तुमचं नाव प्रथमच ऐकलं आहे'.

अशाप्रकारे सार्वजनिक ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केल्यामुळे तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांना आवडलं. त्यावेळी कोट्यावधी चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या मीना कुमारी लाजून हसल्या.

मीना कुमारी यांनी वयाच्या ७व्या वर्षापासूनच चित्रपटात काम करायला सुरवात केली. यानंतर त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. त्यांनी आपल्या चमकदार अभिनयाने लोकांच्या हृदयात खास स्थान निर्माण केलं. मीना यांनी आपल्या आयुष्याची 33 वर्षे सिनेमाला दिली.

मीना कुमारी यांनी 'पाकीजा', 'मेरे अपने', 'आरती', 'परिणीता', 'बैजू बावरा', 'दिल अपना और प्रीत पराई', 'साहेब बीवी और गुलाम', 'दिल एक मंदिर' और 'काजल' अशा चित्रपटांत काम केलं आहे.