मुंबई : बॉलीवूडमधील सगळ्यात सुंदर अभिनेत्रीबद्दल जेव्हा-जेव्हा बोललं जातं तेव्हा सर्वात आधी ज्या अभिनेत्रीचं नाव समोर येतं ते म्हणजे अभिनेत्री मधुबाला. 14 फेब्रुवारी 1933 ला जन्मलेल्या मधुबाला यांनी अगदी लहान वयातच जगाचा निरोप घेतला. मधुबाला यांच्या चाहत्यांमध्ये बाळासाहेब ठाकरे, शम्मी कपूर ते दिलीप कुमार यांचाही समावेश होता.
पेंग्विन इंडियाने प्रकाशित केलेल्या बॉलीवूड टॉप 20 सुपरस्टार्स ऑफ इंडिया या पुस्तकात बाळासाहेब ठाकरे यांनी सिनेसृष्टीत काम करतानाचे दिवस आठवले. मधुबाला यांचा एक किस्सा सांगताना बाळासाहेब ठाकरे यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, 'मी जेव्हा मधुबाला यांना शूटिंग करताना पाहिलं तेव्हा मला वाटलं की, ''माझा आजचा दिवस खास ठरला.''
वेड्यासारखं प्रेम करायचे शम्मी कपूर
शम्मी कपूर यांनी त्यांच्या 'शम्मी कपूर द गेम चेंजर'मध्ये मधुबाला यांना संपूर्ण चॅप्टर डेडिकेट केला आहे. 'फेल मेडले इन लव्ह विथ मधुबाला' या चॅप्टरमध्ये शम्मी कपूर यांनी लिहिलं आहे की, 'मला माहित होतं की, मधू कुणाच्या तरी दुसऱ्याच्या प्रेमात आहेत.'
शम्मी कपूर म्हणाले, 'मला कबूल करायचं आहे की, मी मधूबाला यांच्या प्रेमात वेडा झालो होतो. यासाठी कोणालाच दोष देणार नाही, कारण मी तिच्यापेक्षा सुंदर स्त्री कधीच पाहिली नाही.' रेल का डिब्बा या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मधुबालाला पाहून ते त्यांचे डायलॉग विसरायचे.
अशी झाली होती दिलीप कुमार यांच्यासोबत मधूबाला यांची भेट
मधुबाला आणि दिलीप कुमार एकमेकांचे होऊ शकले नाही खरे, पण त्यांच्या प्रेमाचे किस्से आजही चर्चेत आहेत. दोघं पहिल्यांदा 1955 मध्ये इन्सानियत चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये एकत्र दिसले होते. दिलीप कुमार यांनी त्यांच्या ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितलं की, मधुबाला यांची प्रोडक्शन कंपनी त्यांच्या लग्नाच्या विरोधात होती.