मुंबई : प्रेमकथा, थ्रिलर अशा धाटणीच्या चित्रपटांपासून काहीसं दूर जात काही कलाकार कायमच चौकटीबाहेरील विषय हाताळल्या जाणाऱ्या चित्रपटांना पसंती देतात. अशा कलाकारांची यादी लहान नाही, तितकीच त्यांच्या चित्रपटांचीही यादी लहान नाही. कायमच आव्हानात्मक आणि तितक्याच मनोरंजक पात्रांसाठी जीव ओतून अभिनय करणाऱ्यांमधील असाच एक चेहरा म्हणजे, अभिनेता आय़ुषमान खुराना.
'विकी डोनर'पासून ते अगदी 'बधाई हो' पर्यंतच्या चित्रपटांपर्यंत प्रत्येक वेळी आयुषमान नव्या अंदाजात पाहायला मिळाला. हीच अलिखित परंपरा कायम ठेवत तो पुन्हा एकदा नव्या आणि तितक्याच थक्क करणाऱ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुषमानच्या या आगामी चित्रपटाचं नाव आहे, 'बाला'.
नुकताच त्याच्या या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ज्या माध्यमातून हे 'बाला' प्रकरण काय आहे, याची पुसटशी कल्पना येत आहे. जवळपास एका मिनिटाच्या या टीझरमध्ये आयुषमानचा लूक हा ९०च्या दशकातील असल्याचं कळत आहे. सोबतच 'कोई ना कोई चाहिये... प्यार करने वाला' आणि 'रहने दो छोडो भी जाने दो यार ....', अशी दोन गाणी टीझरची रंगत वाढवत आहेत. मुख्य म्हणजे ज्या प्रकारे ही गाणी चित्रीत करण्यात आली आहेत ते पाहता चित्रपटाचं कथानकही मनोरंजक असणार असाच अंदाज वर्तवण्यात येत आहे.
विरळ केस, टक्कल अशा लूकमध्ये दिसण्याची आयुषमानची ही पहिलीच वेळ त्यामुळे त्याचा हा लूकही चित्रपटासंदर्भातील कुतूहलास कारणीभूत ठरत आहे. आयुषमानसबत या चित्रपटातून अभिनेत्री यामी गौतम आणि भूमी पेडणेकरही झळकणार आहेत. या दोन्ही अभिनेत्रींसोबत आयुषमान दुसऱ्यांदा एखाद्या चित्रपटाच्या निमित्ताने दिसणार आहे. अमर कौशिक दिग्दर्शित आणि दिनेश विजन यांची निर्मिती असणारा हा 'बाला' २२ नोव्हेंबरला सर्वांच्या भेटीला येणार आहे.