अभिनेता विक्रांत मेस्सीची प्रमुख भूमिका असणारा ‘12th Fail’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल तुफान चर्चा रंगली असून, त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. युजर्सकडून इतरांना हा चित्रपट पाहण्याचं आवाहन केलं जात आहे. विधू विनोद चोप्रा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, यादरम्यान एका आयएएस अधिकाऱ्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. आयएएस अधिकारी अवनिश शरण यांनी चित्रपटातील एका सीनचं कौतुक केलं असून, एक्सवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावर अभिनेता विक्रांत मेस्सीही व्यक्त झाला आहे.
‘12th Fail’ चित्रपट हा अनुराग पाठक यांच्या पुस्तकावर आधारित आहे. या पुस्तकातून मनोज कुमार शर्मा यांचा आयपीएस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास उलगडण्यात आला आहे.
अवनिश शरण यांनी ‘12th Fail’ चित्रपटातील क्लायमॅक्स सीन शेअर केला असून यामधील युपीएससी इच्छुकांच्या भावना मांडल्या आहेत. या सीनमध्ये विक्रांत मेस्सीला आपण शेवटच्या प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण केली असल्याचं समजतं. हा चित्रपटातील अत्यंत भावनिक सीनपैकी आहे. उत्तीर्ण झाल्याचं कळताच त्याचे मित्र, प्रेयसी सर्वासोबत तो क्षण साजरा करताना यात दाखवण्यात आलं आहे.
"हा फक्त तुमचा निकाल नाही… सर्व प्रतिकूल परिस्थिती असूनही UPSC परीक्षेत बसण्याची हिंमत दाखविणाऱ्या सर्वांच्या संघर्षाचा हा परिणाम आहे," अशी कॅप्शन अवनिश शरण यांनी व्हिडीओ शेअर करताना दिली आहे.
यह सिर्फ़ आपका रिजल्ट नहीं है…उन तमाम संघर्षों का रिजल्ट है, जो तमाम विषम परिस्थितियों के बावजूद यूपीएससी परीक्षा में बैठने की हिम्मत जुटा पाते हैं. pic.twitter.com/HHskjf28O2
— Awanish Sharan (@AwanishSharan) January 7, 2024
या पोस्टवर विक्रांत मेस्सीही व्यक्त झाला असून कमेंट करताना हात जोडत आभार मानले आहेत.
दरम्यान विक्रांत मेस्सीने ‘12th Fail’ मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितलं की, "काही सीन शूट करत असताना विधू विनोद चोप्रा यांनी कट बोलल्यानंतरही मी रडत असे. त्यावेळी मला भावना आवरणं फार कठीण जात होतं".