VIDEO : मन वयात आलेल्या 'यंग्राड' पोरांची कहाणी

'यंग्राड' हा शब्द बोलीभाषेतील प्रचलित शब्द असून तो नाशिकमध्ये उनाड मुलांसाठी वापरला जातो.

Updated: Jun 19, 2018, 01:24 PM IST

मुंबई : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मकरंद माने लवकरच 'यंग्राड' हा सिनेमा घेऊन येत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. या सिनेमात अभिनेता शरद केळकर, सविता प्रभुणे, शशांक शेंडे, चैतन्य देवरे, सौरभ पडवी, शिव वाघ, जीवन कराळकर आणि शिरीन पाटील या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ६ जुलै २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 

'यंग्राड' हा शब्द बोलीभाषेतील प्रचलित शब्द असून तो भारताची दक्षिण काशी (दक्षिण बनारस) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये उनाड मुलांसाठी वापरला जातो. एखाद्याबरोबर भांडण उकरून काढणे किंवा मित्राला त्याच्या स्वप्नपरीबरोबर सुत जुळवायला मदत करणे यासाठी हे चारही मित्र नेहमीच एकमेकांच्या मदतीला धावून येत असतात. पण या संस्कारक्षम वयात चुकीचे आयडॉल समोर असल्याने हे चार युवक नेहमीच अडचणीत सापडतात. त्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतो आणि आपल्याला आयुष्याची सर्व माहिती आहे, अशा आविर्भावात वावरणारे हे चौघे एका क्षणी अशा निष्कर्षाला येतात की त्यांचे आयुष्यच विस्मरणात गेल्यासारखे होते. त्यानंतर मग ते स्वत्वःचा शोध घेऊ लागतात आणि आयुष्याच्या नवीन प्रवासाला लागतात. ही चार युवकांची कथा असून हे कुमारवयीन मुलं सहजच बळी पडू शकेल अशा वयातील मैत्री, निरागसता, प्रेम, कुटुंब व मूल्ये यांचं महत्त्व अधोरेखित करतात.