मुंबई : बालपण म्हटले की दंगा, मस्ती आणि खट्याळपणा हा ओघानेच येतो. यंदाच्या उन्हाळ्यात असाच एक खट्याळ मुलगा आपल्या सर्वांना भेटायला येत आहे. सुट्ट्यांमध्ये त्याची गम्मत बघणे सर्व बच्चेकंपनी साठी मनोरंजक ठरणार आहे. निष्ठा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या 'मंकी बात' या बहुचर्चित बाल चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला. या टीझरमध्ये आपल्याला एक खोडकर मुलगा माकडचेष्टा करताना दिसतो. तो खेळताना कधी कुणाच्या डोक्यात बॉल मारतो, तर कधी कुणाच्या कामात व्यत्यय आणत उच्छाद मांडतो... कदाचित कुणाला त्रास देऊन त्यास खूप मजा येत असावी... त्यामुळे तो कुणाला खाली पाड, धक्का दे, खाली कुणी उभे असेल तर गच्चीवरून कुंडी भिरकाव असे त्याचे नाना उद्योग सुरूच ठेवतो... विविध तऱ्हांच्या माकड चेष्टा करण्यात तो सतत गुंतलेला असतो... नंतर अचानकपणे एका खऱ्या खुऱ्या माकडाची टीझर मध्ये एन्ट्री होते. ते माकड सैरावैरा फिरताना आपल्याला दिसतं. घराच्या खिडकीतून आरश्यात बघण्याचा प्रयत्न करतं. त्यामुळे टीझर मधून चित्रपटाबद्दल लहान मुलांमध्ये मोठे कुतूहल निर्माण झाले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी यापूर्वी अनेक दर्जेदार चित्रपट बनवले आहेत. त्यांची ही कलाकृती लहानग्यांना खास सुट्ट्यांमधील मेजवानी ठरणार आहे. बऱ्याच कालावधीनंतर मराठीत खास लहान मुलांसाठी बालचित्रपट येत आहे. आकाश पेंढारकर आणि विनोद सातव हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून चित्रपटाची निर्मिती विवेक डी, रश्मी करंबेळकर, मंदार टिल्लू आणि विजू माने यांनी केली आहे तसेच चित्रपटाला संदीप खरे यांची गीते आणि सलील कुलकर्णी यांचे संगीत लाभले आहे.
चित्रपटात बाल कलाकार वेदांत सह पुष्कर श्रोत्री आणि भार्गवी चिरमुले प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच एक गायक, संगीतकार एका वेगळ्या भूमिकेतून आपल्याला सरप्राईज देण्य्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटाची कथा महेंद्र कदम आणि विजू माने यांनी लिहिली असून हलकी फुलकी कॉमेडी असणारा 'मंकी बात' येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.