VIDEO :हेमा मालिनींचा अविश्वसनीय नृत्याविष्कार पाहिला का?

 प्रवासी भारतीय दिवसाच्या निमित्ताने आपली नृत्यकला सादर केली. 

Updated: Jan 23, 2019, 01:44 PM IST
VIDEO :हेमा मालिनींचा अविश्वसनीय नृत्याविष्कार पाहिला का?  title=

वाराणासी : अभिनेत्री हेमा मालिनी यांनी वाराणासी येथे आयोजित प्रवासी भारतीय दिवसाच्या निमित्ताने आपली नृत्यकला सादर केली. कला आणि राजकारण अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये सुरेख समतोल राखणाऱ्या हेमा मालिनी यांचा नृत्याविष्कार पाहून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनीही त्यांना दाद दिली. 'अदभूत, अविश्वसनीय आणि अकल्पनीय' अशा शब्दांमध्ये त्यांनी हेमा मालिनी यांच्या नृत्याची प्रशंसा केली. 

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि देशाच्या मंत्रीमंडळातील मान्यवरांच्या उपस्थितीत हेमा मालिनी यांनी तब्बल ९० मिनिटे आपला नृत्याविष्कार सादर केला. ज्यामध्ये त्यांनी पांढऱ्या रंगाचा सुरेख लेहंगा घातला होता. पवित्र गंगा नदी पृथ्वीतलावर मनुष्यरुपात अवतरली असेल तेव्हा तिची छवी अशीच काहीशी असेल, हेच त्यांचं रुप पाहून स्पष्ट होत होतं. 

गंगा नदीचा इतिहास, वेद- पुराणांमध्ये असणारं महत्त्वं, नदीचा उगम नेमका झाला तरी कसा आणि कशा प्रकारे महादेवाने गंगा नदीच्या प्रवाहाला आपल्या जटांमध्ये स्थान दिलं ही सारी कथा त्यांनी आपल्या नृत्याद्वारे सादर केली. 'एएनआय़' या वृत्तसंस्थेवरुन याविषयीचा एक व्हिडिओही पोस्ट करण्यात आला आहे. तो पाहता नेटकऱ्यांनीही हेमा मालिनी यांच्या नृत्यकौशल्याची प्रशंसा केली आहे. 

सुरेश वाडकर, कविता कृष्णमूर्ती, शंकर महादेवन, मिका सिंग या गायकांनी स्वरबद्ध केलेल्या आणि असित देसाई, त्यांचा मुलगा अलाप देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतावर मालिनी यांनी त्यांची कला सादर केली. यावेळी जणू दैवी शक्तींच्य़ा उपस्थितीतीच कलेचा अदभूत नजराणा सादर होत असल्याची प्रचिती उपस्थितांना आली असणार, असं म्हणायला हरकत नाही.