अजीब दास्ताँ है ये... कधीही न भेटलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याची लतादीदींची इच्छा, पण पुढे...

पहिलं प्रेम अपूर्णच राहिलं.. पण त्यांची निशाणी मात्र दीदी बाळगून होत्या   

Updated: Feb 7, 2022, 05:35 PM IST
अजीब दास्ताँ है ये... कधीही न भेटलेल्या व्यक्तीशी लग्न करण्याची लतादीदींची इच्छा, पण पुढे... title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कुंडलीत असणारा महाभाग्य योग, त्यानंतरची संगीत साधना आणि लतादीदींचा जीवनप्रवास हा प्रत्येकालाच हेवा वाटणारा. प्रेम व्यक्त करणं असो, विरहाच्या वेदना असो किंवा मग हक्काचं माणूस भेटल्याचा आनंद असो. लतादीदींच्या आवाजातील प्रत्येक गाण्यानं गोष्टी फार सोप्या केल्या होत्या. (Lata Mangeshkar Love story)

'अजीब दास्ताँ है ये... कहाँ शुरु कहाँ खतम...' हे त्यांचं गाणं ऐकताना खरंच आयुष्याची ही वळणं किती अशाश्वत आणि अनिश्चित असतात याचीच जाणीव होते. 

दीदींच्या गाण्यांनी प्रेम व्यक्त करण्यास आणि मुलात प्रेम करण्यास शिकवलं. पण, याच दीदींना मात्र प्रेमाचं माणूस भेटलं नाही. 

दीदी आणि त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल खुप लिहिलं गेलं, बोललंही गेलं. तुम्हाला माहितीये का, संगीत साधनेलाच आयुष्य वाहणाऱ्या लता मंगेशकर यांच्या मनाचा ठाव एका गायक- अभिनेत्यानं घेतला होता. 

वयाच्या पाचव्या वर्षी दीदींनी या अभिनेत्याचा, तत्कालीन सुपरस्टारचा चित्रपट पाहिला. कुंदनलाल सहगल, अर्थात केएल सहगल असं त्यांचं नाव. 

सहगल यांचा चित्रपट पाहिल्यानंतर आपण मोठं झाल्यावर यांच्याशी लग्न करणार असल्याचा निर्धार दीदींनी मनोमनी केला होता. 

दीदींचं सेहगल यांच्याप्रती असणारं वेड, प्रेम इतरजणही पाहून होते. दुर्दैव असं की लतादीदी आणि सहगल यांची कधीच भेट झाली नाही. 

हैरान हूँ मै....! लाखात एक होत्या लतादीदी, कुंडलीतच लिहिलेलं लखलखणारं नशीब 

सहगल यांच्याशी लग्न करण्याची स्वप्न पाहणाऱ्या लतादीदी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या घरी गेल्या जिथं त्यांची आठवण म्हणून दीदींनी एक अंगठी मागितल्याचं म्हटलं जातं. 

ही तीच अंगठी जी लतादीदींनी कायम सांभाळून ठेवली. पुढे त्या त्यांच्याच परिनं आयुष्य जगत राहिल्या. 

कमी वयात खांद्यावर आलेली कुटुंबाची जबाबदारी पूर्ण करताना दीदी स्वत:ला विसरुन गेल्या आणि ओघाओघानं त्यांच्या लग्नाचा विषय आणि इच्छाही मागेच पडत गेली.