मुंबई : टीव्ही इंडस्ट्रीच्या प्रसिद्ध जेष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्रीचा जन्म 13 सप्टेंबर 1946 रोजी मुंबईत झाला. या अभिनेत्रीने मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 'सिंहासन' या मराठी चित्रपटातून या अभिनेत्रीने चित्रपटांच्या दुनियेत पाऊल ठेवलं आणि मागे वळून पाहिलं नाही, या अभिनेत्रीने मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही भरपूर काम केलं.
1987 मध्ये, अभिनेत्री तिच्या 'सडक छप' चित्रपटात एका अंध महिलेच्या भूमिकेत दिसली होती. जिथे प्रेक्षकांनी त्याला खूप पसंती दिली. त्यानंतर तिला चित्रपटांमध्ये कामही मिळत राहिलं.
उषा नाडकर्णी जेवढं त्यांच्या अभिनयासाठी ओळखल्या जातात तेवढंच त्या त्यांच्या स्पष्ट वृत्तीसाठीही ओळखल्या जातात. अभिनेता सुबोध भावे होस्ट करत असलेल्या बस बाई बस या लोकप्रिय मराठी शोमध्ये त्या आल्यावर प्रेक्षकांना त्याची झलक पाहायला मिळाली. त्यांच्या कामाचे पैसे त्यांना अनेकदा फोन करूनही मिळत नव्हते. यानंतर त्यांनी काय केलं हा रंजक किस्सा उषा ताईंनी कार्यक्रमात सांगितला.
एका मालिकेसाठी उषा नाडकर्णी यांनी फार कमी वेळे काम केलं. म्हणजेच जेमतेम 10 दिवस काम केलं. ही मालिका त्यांना फारशी आवडत नव्हती. यामुळेच त्यांनी ही मालिका १० दिवसातच सोडली. मात्र १० दिवसांचे त्यांचे पैसे मालिकेशी निगडीत मॅनेजर देतच नव्हता. अनेकदा फोन करूनही तो फोनवर न उचलता दुसरंच कोणीतरी फोन उचलायचं. उषा यांनी अनेकदा फोन करून थकबाकीची मागणी केली. या परिस्थितीत १० दिवसांच्या कामावर पाणी सोडण्याऐवजी त्यांनी जिद्दीने आपल्या कष्टाचे पैसे मिळवण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केली.
एकेदिवशी मॅनेजरने अचानक फोन उचलला. यावेळी, अभिनेत्रीने मॅनेजरला चांगलंच धारेवर धरलं. त्यांचे कामाचे पैसे दिले जाणार की नाही हे त्यांनी पुन्हा एकदा विचारलं. उषा पुढे म्हणाल्या की, जर त्यांचं मानधन दिलं गेलं नाही तर त्या ऑफिसमध्ये येऊन जबरदस्तीने पैसे घेतील. यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांना त्यांच्या कामाचा धनादेश मिळाला.