मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा बहुचर्चित चित्रपट 'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल' लवकरच प्रदर्शित होणार आहे. या बहुचर्चित चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटामध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरने मुख्य भूमिका साकारली आहे. आपल्या स्वप्नांना बळ देणाऱ्या गुंजनच्या मार्गात अनेक अडचणी आल्या तरी देखील ध्येयाच्या वाट्यात आलेल्या सर्व अडचणींवर मात करत आपलं वैमानिक होण्याचं स्वप्न गुंजन कशा प्रकारे पूर्ण करते याचा प्रत्येय प्रेक्षकांना चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.
1999 च्या कारगिल युद्धात चीता हेलिकॉप्टर उडवून युद्ध भागात जाणारी गुंजन सक्सेना पहिलीच एयरफोर्स वुमन ऑफिसर बनली. आज भारतीय हवाई दलात 1600 हून अधिक महिला ऑफिसर असल्याचं सांगत येतं. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आता महिलांचं वर्चस्व आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
प्रत्येक यशस्वी स्त्रीमागे एक पुरूष असतो, तर गुंजनच्या यशामागे तिचे वडील असल्याचं चित्रपटाच्या ट्रेलरच्या मध्यमातून समोर येत आहे. चित्रपटात जान्हवीच्या पित्याची व्यक्तिरेखा अभिनेता पंकज त्रिपाठीने साकारली आहे.
दरम्यान, करण जोहरने हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित न होता, डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे. जान्हवी कपूरचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर १२ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.
वायुदलातील पहिल्या महिला वैमानिक असणाऱ्या गुंजन सक्सेना यांनी १९९९ मध्ये कारगिल युद्धादरम्यान, महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं. त्यांच्या या साहसपूर्ण योगदानासाठी मानाच्या अशा शौर्य वीर पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं होतं. हीच शौर्यगाथा आता प्रेक्षकांना नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.