मुंबई : कलाविश्वात फक्त आणि फक्त चाहते हे मनोरंजनाच्याच प्रतीक्षेत असतात असं नाही. या अनोख्या दुनियेत कलाकार आणि चाहत्यांमध्ये एक असं नातं आकारस येतं, जे अनेकदा सर्वतोपरी महत्त्वाचं ठरतं. चाहत्यांसोबतचं असंच नातं जपणाऱ्या एका अभिनेत्रीच्या आयुष्यात एका नव्या पाहुण्याचं, खरंतर पाहुणीचं आगमन झालं आहे. ज्याविषयी तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे.
दुसऱ्यांदा मातृत्वाचं सुख लाभलेली ही अभिनेत्री आहे ईशा देओल. ईशा आणि तिचा पती भरत तख्तानी यांनी १० जून २०१९, या दिवशी त्यांच्या दुसऱ्या राजकन्येचं स्वागत केलं. नव्या चिमुरडीच्या जन्मानंतर ईशाची मुलगी राध्या खऱ्या अर्थाने मोठी बहीण झाली आहे. तर, हिंदी कलाविश्वातील 'ड्रिमगर्ल' असणाऱ्या हेमा मालिनी या पुन्हा एकदा आजी झाल्या आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम सक्रिय असणाऱ्या ईशाने एक सुरेख पोस्ट लिहित आपल्या मुलीचं या जगात स्वागत केलं. सोबतच या मुलीचं नाव काय असणार, यावरुनही तिने पडदा उचलला. सोबतच चाहत्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत तिने सर्वांचेच सहृदय आभारही मानले. ईशाच्या लहान मुलीचं ना आहे, मिराया तख्तानी. मिराया.... हे नाव कळताच कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली.
२०१२ मध्ये ईशा आणि भरत तख्तानी विवाहबंधनात अडकले होते. ज्यानंतर काही वर्षांनी त्यांना राध्या या त्यांच्या पहिल्या मुलीचं स्वागत केलं. आजच्या घडीला ही सेलिब्रिटी जोडी, दोन मुलींच्या पालकत्वाची जबाबदारी घेताना दिसत आहे.