आता कोणाचो नंबर? ‘पंचक’चा उत्कंठा वाढवणारा टीझर प्रदर्शित...

Panchak teaser :  'पंचक' या हटके चित्रपटाचा टीझर प्रदर्शित. तर चित्रपटाची निर्मिती ही माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉक्टर श्रीराम नेने यांनी केली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 2, 2023, 10:57 AM IST
आता कोणाचो नंबर? ‘पंचक’चा उत्कंठा वाढवणारा टीझर प्रदर्शित... title=
(Photo Credit : Social Media)

Panchak teaser : पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. यात शुभ अशुभ घडले की ते पाच पटीनं वाढतं असं म्हटलं जातं. याच संकल्पनेवर आधारित 'पंचक' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याच चित्रपटाचे जबरदस्त टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नक्कीच भरभरून मनोरंजन करणारा कौटुंबिक चित्रपट आहे. 5 जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन जयंत जठार आणि राहुल आवटे यांचे आहे. या चित्रपटाची निर्मिती ही डॉ. श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने यांनी केली आहे. तर नितीन प्रकाश वैद्य हे कार्यकारी निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन राहुल आवटे यांचे आहे. 

टीझरमध्ये दिसतेय की, पंचकमुळे सर्वांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे प्रत्येकालाच आता कोणाचा नंबर लागणार याची भीती वाटतेय. हीच भीती विनोदी शैलीत सादर केली आहे. प्रत्येक जण आपला जीव वाचवण्यासाठी काय सर्कस करणार हे पाहायला मजा येणार आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने ही मराठमोळी जोडी, मराठी प्रेक्षकांसाठी हा खास चित्रपट घेऊन येत आहे. यात आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता धुरी, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दीप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर यांसारख्या उत्तम कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.  

हेही वाचा : Animal Box Office Collection Day 1 : पहिल्या दिवशी रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' नं केला 100 कोटींचा आकडा पार!

माधुरी दीक्षित या चित्रपटाबद्दल म्हणतात, ‘पंचक’ ही आमची दुसरी निर्मिती असून यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. ‘पंचक’ हा आम्ही खूप मनापासून बनवलेला चित्रपट असून नक्कीच प्रेक्षकांसाठी हा मनोरंजनाचा डोस ठरेल याची मला खात्री आहे. मराठीतील अनेक दिग्गज कलाकार 'पंचक'चा भाग आहेत. हळूहळू अनेक गोष्टी समोर येतीलच. टीझर बघून प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. गंभीर परिस्थिती अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न 'पंचक'मधून करण्यात आला असून सिच्युएशनल कॉमेडी आणि ब्लॅक कॅामेडी यांचा मेळ यात पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 5 जानेवारीला ‘पंचक’ घेऊन आम्ही येत आहोत, जो सर्वांना वर्षभर आनंदी ठेवेल.'