मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant Singh Rajput) १४ जून रोजी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी रात्री ३ वाजता त्याने आपला अगदी जवळचा मित्र आणि अभिनेता महेश शेट्टीला (Mahesh Shetty) फोन केला होता. मात्र तो फोन महेशने उचलला नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर चार दिवसांनी महेशने इंस्टाग्रामवर भावूक पोस्ट शेअर केली आहे.
बरेच काही अनुत्तरीत राहिले आहे आणि बोलण्यासाठी बरेच काही बाकी आहे. मी तुला पुन्हा पुन्हा भेटलो तेव्हा मी त्याबद्दल सर्व सांगेन.... असं म्हणत अखेर अभिनेता महेश शेट्टीने आपल्या दुःखाला वाट करून दिली आहे.
'पवित्र रिश्ता' या मालिकेतून ओळख झालेले महेश शेट्टी आणि सुशांत सिंह राजपूत हे दोघे अगदी जवळचे मित्र. सुशांतच्या अशा अचानक जाण्याने महेशला खूप मोठा धक्का बसला. अखेर त्याने आपल्या जवळच्या व्यक्तीच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं आहे.
महेशने या पोस्टमध्ये सुशांतसोबतचा फोटो शेअर करून एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये तो म्हणतो की,'कधी-कधी आपण आयुष्यात अशा व्यक्तींना भेटतो. त्यांच्याशी खास नात निर्माण होतं. असं वाटतं की, आपण त्यांना संपूर्ण आयुष्य ओळखतोय. तेव्हा तुम्हाला जाणीव होते की, भावाचं नातं निर्माण होण्यासाठी एकाच गर्भातून जन्म घेणं गरजेचं नसतं. याचप्रकारे आम्ही भेटलो.....'
सुशांत सिंह राजपूत आणि महेश शेट्टी हे खूप चांगले मित्र होते. त्यांचा हा प्रवास मालिकांपासून सुरू झाला होता. दोघांनी घालवलेला एकमेकांसोबतचा वेळ आणि तेव्हाच्या आठवणीने महेशने इथे शेअर केल्या आहेत.