मुंबई : अभिनेत्री श्रुती हसन तिच्या खासगी आयुष्याबद्दल उघडपणे बोलण्यासाठी ओळखली जाते. नुकतंच तिने आपल्या नाकाच्या सर्जरीबद्दल जाहीरपणे कबुली दिली आहे. श्रुतीने नुकतंच मीडियाला सांगितलं की, तिने सुंदर दिसण्यासाठी तिच्या नाकाची सर्जरी केली आहे. श्रुतीने असंही म्हटलं आहे की, लोकं तिच्या लूकबद्दल काय बोलतात याने तिला काही फरक पडत नाही आणि ती याचं समर्थन करत नाही. तिने म्हटले आहे की, तिचं शरीर आहे आणि तिने या शरीराला हवं तसं ठेवावं.
रेखीव नसलेल्या नाकाने केला पहिला चित्रपट
मीडियाला दिलेल्या एका मुलाखतीत श्रुती म्हणाली, "मी नोज जॉब केला आहे. माझं नाक आधी रेखीव नव्हतं. आणि खूप वेगळं झालं होतं. मी माझा पहिला चित्रपट मी रेखीव नसलेल्या नाकाने केला होता. नंतर मी त्याची सर्जरी केली. कारण मला ते सुंदर बनवायचं होतं. मला माझा चेहरा सुंदर बनवायचा असेल तर अडचण काय आहे. मी कशी दिसते किंवा दिसत नाही हे कोणालाच जस्टिफाई नाही करु शकत. माझं शरीर आहे. मला ते हवं तसं मी ठेवेन."
अभिनेत्री तिच्या मुलाखतीत पुढे म्हणाली, "मी या गोष्टींना प्रमोट करत नाही. जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल तर बिंधास्त करा आणि जर तुम्हाला ते करायचं नसेल तर ते अजिबात करू नका, परंतु मला जे करायचे आहे ते करू द्या. श्रुतीने असंही म्हटलं आहे की, सुरुवातीला तिला सांगितलं होतं की, ती हिरोईनसारखी दिसत नाही. लोकं माझ्याबद्दल म्हणायचे, "श्रुतीचा चेहरा परदेशींसारखा दिसतो, तिच्यात टॅलेंट आहे पण ती भारतीय दिसत नाही पण जेव्हा मी चित्रपट करायला सुरुवात केली तेव्हा मला गावाकडच्या मुलीचे रोल जास्त मिळाले."
लवकरच प्रभाससोबत सालार या चित्रपटात दिसणार आहे
श्रुती हासनच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचं झाले तर, तिचा पुढचा चित्रपट सालार असेल ज्यामध्ये ती प्रभाससोबत दिसणार आहे. यानंतर ती चिरंजीवीसोबत मेगा १५४ मध्येही दिसणार आहे.