मुंबई : हैदराबाद पोलिसांनी बुधवारी एका कारवाईदरम्यान, तेलुगू टेलिव्हिजन अभिनेता मधु प्रकाश याला हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्या पत्नीने आत्महत्या करुन आयुष्य संपवल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याला अटक करण्यात आली.
मधुने एस.एस. राजामौली यांच्या दिग्दर्शनात साकारलेल्या 'बाहुबली' या प्रचंड गाजलेल्या चित्रपचटातही एक लहानशी भूमिका साकारली होती. त्याच्या पत्नीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी पोलिसांत रितसर तक्रार दाखल करतान मधूला अटक करण्यात आली. त्यांनी आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी त्यालाच जबाबदार ठरवलं आहे. मंगळवारी रात्री मनीकोंडा येथील राहत्या घरी मधुच्या पत्नीने (भारती; वय- ३४ वर्षे) गळफास लावून आत्महत्या केली होती.
आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळताच भारतीच्या घरातल्या मंडळींनी आपल्या मुलीचा पती म्हणजेच अभिनेता मधू हा हुंड्यासाठी तिचा छळ करत होता, असे आरोप करत रायदुर्गम पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. ज्यानंतर मधुला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील मुळच्या असणाऱ्या भारतीशी मधुने २०१५ मध्ये भारतीशी लग्न केलं होतं. मधुच्या नेहमीच घरी उशिरा येण्याच्या सवयीमुळे त्यांच्यात वारंवार भांडणं होत असत. भारतीच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांनुसार त्याचे एका महिलेशी विवाहबाह्य प्रेमसंबंधही होते. मुख्य म्हणजे मधुला १५ लाख रुपयांचा हुंडा लग्नाच्याच वेळी देण्यात आलेला असतानाही आणखी पैशांसाठी आपल्या मुलीचा मधुने छळ केल्याचाही आरोप त्याच्यावर भारतीच्या कुटुंबीयांनी केला.