बाहुबलीनंतर राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा करणार नवा विक्रम

'आरआरआर' या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Updated: Jun 20, 2019, 01:05 PM IST
बाहुबलीनंतर राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा करणार नवा विक्रम title=

प्रेरणा कोरगांवकर, झी मीडिया, मुंबई : दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा आगामी आरआरआर हा चित्रपट बाहुबली सिरीजचे सगळे रेकॉर्ड तोडणार अशी चिन्ह आता दिसू लागली आहेत.  दिग्दर्शक एस.एस. राजामौलींच्या बाहूबली सिरिजनं ब़ॉक्स ऑफिसवर विक्रम केला होता. बाहुबली चित्रपटानं ७५० कोटी तर बाहुबली २ या चित्रपटानं १०८० कोटींचा आकडा पार केला होता. त्यामुळे राजामौली यांच्या आगामी 'आरआरआर' या चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या चित्रपटानं प्रदर्शनाआधीच परदेशातील थिएटर राईट्ससह तब्बल ७० कोटींची कमाई केली आहे. परदेशातील फिल्म डिस्ट्रीब्युशन हाऊस 'फार्स फिल्म' सोबत राजामौलींनी मोठी डील केली आहे. भारतीय सिनेमातील ही सगळ्यात मोठी डील असल्याचं समजतं आहे.

'आरआरआर' या चित्रपटाचं बजेट हे ३०० कोटी एवढं होतं. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता रामचरण आणि ज्यूनियर एनटीआर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. चुलबुली गर्ल आलिया भट ही रामचरण आणि ज्यूनियर एनटीआरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तर सिंघम अजय देवगण या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे.

'आरआरआर' चित्रपटाचं बजेट आणि तगडी स्टार पाहता हा चित्रपट आता बॉक्स ऑफिसवर कोणता नवा विक्रम कऱणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.