चीनमध्ये प्रदर्शित होणार श्रीदेवी यांचा चित्रपट

श्रीदेवी यांचा 'मॉम' चित्रपट येत्या २२ मार्च रोजी चीनमध्ये प्रदर्शित होणार

Updated: Feb 28, 2019, 04:45 PM IST
चीनमध्ये प्रदर्शित होणार श्रीदेवी यांचा चित्रपट  title=

नवी दिल्ली : बॉलिवूडच्या दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री यांनी अतिशय कमी वयात या जगाचा निरोप घेतला. श्रीदेवी यांचा 'मॉम' चित्रपट येत्या २२ मार्च रोजी चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. 'झी स्टुडिओज इंटरनॅशनल'ने चित्रपटाला पोलंड, रशिया, अमेरिका आणि सिंगापूरसहित इतर ४० ठिकाणी लॉन्च करण्यात आले आहे. आता हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. 

'झी स्टुडिओज इंटरनॅशनल'चे चित्रपट निर्माते, वितरण प्रमुख विभा चोप्रा यांनी 'एका कलाकाराचा वारसा त्याच्या कामानेच कायमस्वरूपी राहतो. तोच वारसा श्रीदेवी आपल्यासाठी ठेऊन गेल्या आहेत. आणि मॉम याचं एक सर्वश्रेष्ठ उदाहरण आहे. हा चित्रपट जिथे-जिथे प्रदर्शित झाला त्या सर्वच ठिकाणी चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाला आणखी एका बाजारात आणून त्याला प्रसारित करण्याचा अभिमान असल्याचं' त्यांनी सांगितलं.

रवि उद्यावर दिग्दर्शित 'मॉम' चित्रपटात श्रीदेवी यांनी सावत्र मुलीचा बदला घेण्यासाठी निघालेल्या आईची भूमिका साकारली आहे. श्रीदेवी यांच्या सावत्र मुलीची भूमिका पाकिस्तानी अभिनेत्री सजल अलीने साकारली आहे. श्रीदेवी यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. 'मॉम असा चित्रपट आहे जो माता आणि प्रेक्षक या दोघांना एकत्र जोडतो. हा श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट आहे. आणि आमचं ध्येय या चित्रपटाला सर्वाधिक लोकांना दाखवणं असल्याचं' बोनी कपूर यांनी म्हटलं आहे.

'इंग्लिश-विंग्लिश' चित्रपटाच्या पाच वर्षांनंतर श्रीदेवी यांनी २०१७ साली रवि उद्यावर यांच्या 'मॉम' चित्रपटातून दमदार अभिनय साकारला होता. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'झीरो'मध्येही त्यांनी एक छोटी भूमिका साकारली होती. श्रीदेवी यांचे गेल्या वर्षी २४ फेब्रुवारी रोजी निधन झाले होते.