नवी दिल्ली : 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'चे दिग्दर्शक कृष जगर्लामुदी यांनी या सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता अभिनेता सोनू सूदनंही या सिनेमातून एक्झिट घेतलीय. कोणताही वाद टाळत सोनूनं तारखांच्या समस्या असल्यानं या सिनेमातून माघार घेतल्याचं सांगितलं... पण, अभिनेत्री कंगना रानौतनं मात्र 'एका महिला दिग्दर्शकासोबत काम करणं पसंत नसल्यनं' सोनूनं हा सिनेमा सोडल्याचं म्हटलंय. या सिनेमात सोनू सूद एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार होता... गेल्याच वर्षी त्यानं आपल्या भूमिकेचं शुटिंगही केलं होतं. परंतु, सोनूनं मात्र आता या सिनेमातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.
या सिनेमाच्या निमित्तानं 'जोधा अकबर'नंतर सोनू पुन्हा एका ऐतिहासिक सिनेमात दिसणार होता. या सिनेमासाठी सोनूनं घोडेस्वारी आणि तलवारबाजीचंही शिक्षण घेतलं होतं.
'मणिकर्णिका'साठी आपल्या इतर कमिटमेंटस सोडू शकत नाही... याबद्दल मणिकर्णिकेच्या मेकर्सशीही आपलं बोलणं झालं होतं... त्यामुळे सिनेमाच्या टीमला शुभेच्छा देऊन तो पुढे निघालाय...' असं सोनूच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.
दिग्दर्शक कृष जगर्लामुदी सिनेमातून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्री कंगना रानौतनंच या सिनेमाच्या दिग्दर्शकाची भूमिका सांभाळलीय. सोनूच्या एक्झिटमागचं कारण मात्र कंगनानं वेगळंच असल्याचं सांगितलंय. 'पिंकविला'नं दिलेल्या माहितीनुसार, 'गेल्या वर्षी कृष यांच्यासोबत झालेल्या शुटिंगनंतर सोनू आणि मी आत्तापर्यंत भेटलेलोही नाही. तो त्याच्या सिंबा या दुसऱ्या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त होता. त्यानं आपल्या संभावित तारखा दिल्या नव्हत्या. प्रोड्युसरनं त्यांना सिनेमा दाखवला आणि उरलेल्या भागाची शुटिंग करायचं म्हटलं... परंतु, त्यांनी मला भेटण्यासही नकार दिला. त्यानं महिला दिग्दर्शकासोबत काम करण्यास नकार दिलाय... आणि माझ्यासाठी हे धक्कादायक आहे... कारण सोनू माझा चांगला मित्र आहे... टीमनं त्याला माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, असं सांगितलंय... पण सोनूकडे ना तारखा आहेत ना विश्वास, असं वाटतंय' अशी तिखट प्रतिक्रिया कंगनानं दिलीय.
सोनूनंतर आता या भूमिकेसाठी अभिनेता जीशान अयूबची निवड करण्यात आलीय. ही भूमिका आता पुन्हा एकदा शूट करण्यात येणार आहे. हा सिनेमा येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.