जयपूर : पद्मावत चित्रपटावरून सुरु असलेला वाद मिटवण्याच्या संजय लीला भन्सालींच्या प्रयत्नांना यश येताना दिसतंय. रिलीजआधी चित्रपट बघण्याचं संजय लीला भन्सालींचं निमंत्रण राजपूत करणी सेनेनं स्वीकारलं आहे.
पद्मावत चित्रपट बघायला आम्ही तयार आहोत. हा चित्रपट बघणार नाही असं आम्ही कधीच म्हणलो नव्हतो. चित्रपटाच्या विशेष स्क्रीनींगला आम्हाला बोलावलं जाईल, असं आश्वासन निर्मात्यांनी आम्हाला दिलं होतं, असं करणी सेनेचे लोकेंद्र सिंग कालवी म्हणाले आहेत.
राजपूत करणी सेना आणि राजपूत सभा जयपूरला २० जानेवारीला भन्साली प्रोडक्शननं चित्रपट बघण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. चित्रपटामध्ये राणी पद्मावती आणि अलाऊद्दीन खिलजी यांच्यामध्ये कोणताही प्रेम प्रसंग दाखवण्यात आलेला नाही, असं या पत्रात स्पष्ट करण्यात आलं होतं.
राजपूत करणी सेनेच्या सदस्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. आणि उत्तर प्रदेशमध्ये चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. उत्तर प्रदेशमध्ये चित्रपट रिलीज झाला तर चित्रपटगृहात जनता कर्फ्यू लावेल, असा इशारा करणी सेनेनं दिला आहे. या चित्रपटामधल्या ४० गोष्टींवर आम्हाला आक्षेप असल्याचं कालवी म्हणाले.