आपण इतके खालच्या थराला गेलोय की प्रार्थनेलाही थुंकणं म्हणतो, कोणत्या सेलिब्रिटीचा संताप अनावर?

रांगेतून पुढे जात त्यानं दीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि नतमस्तक होत त्यानं दोन्ही हात पुढे धरत त्यांच्या अखेरच्या प्रवासासाठी दुआ केली. 

Updated: Feb 8, 2022, 01:26 PM IST
आपण इतके खालच्या थराला गेलोय की प्रार्थनेलाही थुंकणं म्हणतो, कोणत्या सेलिब्रिटीचा संताप अनावर?  title=
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : ज्येष्ठ गायिका, भारत रत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर सारा देश हळहळला. दीदीना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिग्गजांनी शिवाजी पार्कची वाट धरली. सर्व क्षेत्रांतील नामांकितांची उपस्थिती यावेळी पाहायला मिळाली. (Lata mangeshkar shahrukh khan)

अभिनेता शाहरुख खान हासुद्धा यावेळी दीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांना अखेरचं डोळे भरुन पाहण्यासाठी आला होता. 

रांगेतून पुढे जात त्यानं दीदींच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं आणि नतमस्तक होत त्यानं दोन्ही हात पुढे धरत त्यांच्या अखेरच्या प्रवासासाठी दुआ केली. 

दुआ केल्यानंतर त्यानं फुंकरही घातली. आपल्या व्यक्तींसाठी केल्या जाणाऱ्या या त्याच्या कृत्यानं सर्वांना भारावून सोडलं. 

पण, काही समाजकंटकांनी मात्र त्याच्या या कृत्याचा विपर्यास केला आणि याला वेगळं वळण दिलं. इथं धर्मांत असणारं अंतरही त्यांनी अधोरेखित केलं. 

शाहरुख तिथे थुंकला, असंच ही मंडळी म्हणू लागली. ज्यामुळं अनेकांनीच यावर संतप्त प्रतिक्रियाही दिल्या. 

शाहरुखची ही कृती खरंतर कोणत्याही अपेक्षेशिवाय केलेली होती. दीदींना चिरशांती लाभावी हीच यामागची भावना. पण, त्यालाही वेगळं वळण दिलं गेलंच. 

इतक्या मोठ्या व्यक्तीच्या निधनाक्षणी घडलेल्या प्रसंगांचं राजकारण, त्यांचा विपर्यास केला जात असल्याचं पाहून अभिनेत्री आणि राजकारणात सक्रिय असणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. 

ट्विट करत त्यांनी लिहिलं, 'हे थुंकणं नाही... दुआ फुंकणं आहे. आपण किती खालच्या पातळीला गेलो आहोत, की साधी प्रार्थनासुद्धा आपल्याला थुंकणं वाटतंय.'

तुम्ही एका अशा व्यक्तीबद्दल बोलत आहात, ज्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधीत्त्वं केलं आहे, असं म्हणत राजकारण इतक्या खालच्या पातळीवर गेलं आहे असंही त्या म्हणाल्या. 

शाहरुख ज्या वेळी दुआ करत होता, तेव्हा त्याच्याच शेजारी त्याची मॅनेजर हात जोडून दीदींच्या पार्थिवासमोर प्रार्थना करताना दिसली. या फोटोतील ते सौंदर्य आणि विविधतेतील एकताही काहींनी टीपली. 

पण, यातही ज्यांनी दुजाभाव पाहिला त्यांच्या बुद्धीची आता खरंच किव येत आहे. 

त्याहीपेक्षा शाहरुख खाननं केलेल्या कृतीची इतकी चर्चाच का होतेय हा इथं मुद्दा... धर्मांमधील अंतर कोणाच्या निधनाच्या वेळी चर्चेत आणण्या इतका मोकळा वेळ खरचं आहे का तुमच्याकडे?