Shahrukh Khan Birthday : शाहरुख खान... हा एक असा कलाकार ज्याची वेगळी ओळख करून देण्याची काहीच गरज नाही. कोणाचाही वरदहस्त करताना शाहरुखनं कलाजगतामध्ये प्रसिद्धी मिळवली आणि या प्रसिद्धीच्या बळावर तो मोठा झाला. अशा या किंग खानच्या 59 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सारं कलाविश्व आणि चाहतावर्ग त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही शेअर केले जात आहेत. यातलाच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषयही ठरत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये शाहरुख खान धर्माविषयी बोलताना दिसत आहे. गौरी आणि शाहरुख खाननं कायमच त्यांच्या मुलांसमवेत कुटुंबातच धर्माविषयी कोणताही भेदभाव बाळगला नाही. दिवाळीपासून ईद आणि अगदी नाताळसण साजरा करणाऱ्या या किंग खानच्या कुटुंबात धर्माकडे नेमकं कोणत्या दृष्टीनं पाहिलं जातं, धर्मावर त्याचा किती विश्वास आहे याचविषयी शाहरुख या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
शाहरुख एका मुस्लिम कुटुंबातील असून, त्यानं हिंदू कुटुंबातील गौरी छिब्बरशी लग्न केलं होतं पण, कधीच त्यांच्या नात्यात धर्मवरून तेढ निर्माण झाली नाही. मुळात धर्माकडे पाहण्याचा वेगळा आणि स्वतंत्र दृष्टीकोन शाहरुख आणि गौरीनं बाळगल्यामुळं तेच संस्कार त्यांच्या मुलांवरही होताना दिसतात.
व्हायरल होणारा व्हिडीओ शाहरुखच्याच एका जुन्या मुलाखतीतील असून, ही मुलाखत म्हणजे BBC चा एक माहितीपटवजा व्हिडीओ आहे. 2004 मध्ये किंग खानच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्याच वेळचा हा व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी शाहरुख मुलांना देवाची पूजाअर्चा करण्याविषयीची माहिती देताना दिसत आहे.
धर्माविषयी शाहरुख म्हणाला होता...
'मुलांना देवाचं महत्त्वं कळायलाच हवं. मग ते हिंदू धर्माबद्दल असो किंवा मुस्लिम धर्माबद्दल. त्यामुळं गणपती आणि लक्ष्मीच्या शेजारी आम्ही कुराणसुद्धा ठेवतो. आम्ही देवापुढे हात जोडून नतमस्तक होतो, गायत्रीमंत्री बोलतो, मी बिस्मिल्लाह म्हणतो. मी धर्म मानत नाही, पण अल्लाहवर माझा प्रचंड विश्वास आहे. माझ्यावर कधीच माझ्या पालकांनी पाच वेळा नमाज पठणाची बळजबरी केली नाही. घरात दिवाळी, ईद आणि नाताळही साजरा केला जातो.'