शाहिदची आई म्हणते, प्रेक्षकांनी 'कबीर सिंह' बनू नये...

निलिमा अजीम यांनी शाहीदची बाजू घेत त्याचं या भूमिकेबद्दल कौतुक केलंय

Updated: Jun 29, 2019, 02:02 PM IST
शाहिदची आई म्हणते, प्रेक्षकांनी 'कबीर सिंह' बनू नये...  title=

मुंबई : शाहीद कपूरचा 'कबीर सिंह' हा सिनेमा प्रदर्शित होऊन आता आठवडा उलटलाय. तरीदेखील या सिनेमाचा वाद मात्र सुरूच आहे. या सिनेमात शाहीद कपूरनं निभावलेल्या पात्र महिलांचं अनादर करणारं आणि महिलांसोबत चुकीचं वागत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. अशा भूमिकांमधून प्रेक्षकांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याचंही अनेकांनी म्हटलंय. अशा भूमिका निभावणं नैतिकदृष्ट्या चुकीचं असल्याचंही सांगत काही जणांनी शाहिदवरही टीका केलीय. शाहीद कपूरनं निभावलेल्या 'कबीर सिंह' या भूमिकेवर कुणाच्या काही प्रतिक्रिया असल्या तरीदेखील शाहीदची आई निलिमा अजीम या मात्र अशावेळी शाहीदच्या मागे भरभक्कमपणे उभ्या राहिल्यात. 

निलिमा अजीम यांनी शाहीदची बाजू घेत त्याचं या भूमिकेबद्दल कौतुक केलंय. अशा परफॉर्मन्ससाठी हॉलीवूडमध्ये कलाकारांना ऑस्कर पुरस्कार दिला जातो, असंही त्यांनी म्हटलंय. 'नैतिकदृष्ट्या चुकीच्या असलेल्या व्यक्तींची भूमिका निभावण्याचं स्वातंत्र्य कलाकारांना आहे. कारण यासाठी त्यांना आपलं कसब पणाला लावावं लागतं. जर उद्या एखाद्या कलाकारानं 'सायको किलर'ची भूमिका निभावली आणि दर्शकांनी ती पाहिली, तर लगेच तेही सायको किलर बनतील का? दिलीप कुमार आणि राजेश खन्ना यांसारख्या कलाकारांनीदेखील नकारात्मक शेड असलेल्या भूमिका निभावल्या आहेत. जे लोक 'कबीर सिंह'ला विरोध करत आहेत ते असं सुचवत आहेत का की कलाकारांनी नकारात्मक भूमिका करणंच बंद करावं? 'कबीर सिंह' आपल्या वर्तवणुकीमुळेच अनेक अडचणींचा सामना करतो. त्याला कुणीही प्रोत्साहन देत नाही. हा सिनेमा पाहिल्यानंतर दर्शकांनी आपल्याला कबीर सिंह बनायचं नाही, अशीच शिकवण घ्यायला हवी' असंही त्यांनी आपलं म्हणणं स्पष्ट करताना म्हटलंय. 

गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या शाहीदच्या या सिनेमानं केवळ तीन दिवसांत ५० करोड आणि पाच दिवसांत १०० करोडचा आकडा पार केलाय.