HDFC ग्राहकांसाठी महत्वाची सूचना: 9 आणि 16 तारखेला होणार नाहीत 'ही' कामं, वेळा नोंदवून ठेवा!

HDFC Bank Update:  या कालावधीत ग्राहकांना काही सुविंधांसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jun 8, 2024, 07:45 PM IST
HDFC ग्राहकांसाठी महत्वाची सूचना: 9 आणि 16 तारखेला होणार नाहीत 'ही' कामं, वेळा नोंदवून ठेवा! title=
HDFC Bank Alert

HDFC Bank Update: तुम्ही खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 9 आणि 16 जून रोजी ग्राहकांना बॅंकेच्या काही सेवांचा लाभ घेता येणार नाही. बॅंकेसंदर्भातील सेवांसाठी सिस्टिम अपग्रेड करण्यात येत आहे. त्या कालावधीत ग्राहकांना काही सुविंधांसाठी अडचणी येण्याची शक्यता आहे. एचडीएफसी बॅंकेने एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना हा अलर्ट दिला आहे. तसेच ईमेलच्या माध्यमातूनदेखील कळविण्यात आले आहे. 

एचडीएफसी ही देशातील सर्वात मोठ्या बॅंकांपैकी एक बॅंक आहे. या बॅंकेचे देशात लाखो ग्राहक आहेत. त्यामुळे सर्वांसाठी ही महत्वाची माहिती असेल. एचडीएफसी बँकेची मोबाइल बँकिंग आणि नेट बँकिंग सेवा 9 आणि 16 जून रोजी काही वेळ ग्राहकांसाठी उपलब्ध नसेल. बँकेकडून 9 आणि 16 जून या 2 दिवसांमध्ये एचडीएफसी बँकेशी संबंधित सेवा सिस्टम अपग्रेड करण्याचे ठरवले आहे. ज्यामुळे त्या काळात सेवा उपलब्ध होणार नाही.

कोणत्या वेळेत सेवा नसेल?

एचडीएफसी बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना 9 जून रोजी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांपासून ते 6 वाजून 30 मिनिटांपर्यंत असे 3 तास ग्राहकांना बँक सेवा मिळणार नाही. 16 जून रोजी पहाटे 3 वाजून 30 मिनिटे ते सकाळी 7 वाजून 30 मिनिटांपर्यंत असे 4 तास ग्राहकांना सेवा मिळणार नाही.

कोणत्या सेवांवर परिणाम? 

बँक खात्याशी संबंधित सेवा
बँक खात्यातील सेव्हिंग
फंड ट्रान्स्फर संबंधित IMPS, NEFT, RTGS सेवा उपलब्ध नसतील.
बँक पासबुक डाउनलोड
एक्स्टर्नल मर्चंट पेमेंट सेवा
झटपट खाते उघडणे
UPI पेमेंट

याआधीही थांबविण्यात आली होती सेवा

देखभाल दुरुस्तीच्या कारणामुळे यापूर्वीदेखील बॅंकेची सेवा काही काळासाठी थांबविण्यात आली होती.  HDFC बँकने याआधी केलेल्या अपडेटमध्ये डेबिट, क्रेडिट आणि प्रीपेड कार्ड ट्रान्झाक्शन 4 जून 2024 रोजी सकाळी 12:30 ते दुपारी 2.30 पर्यंत आणि 6 जून रोजी दुपारी 12:30 ते 2:30 पर्यंत उपलब्ध नव्हते.

स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड युजर्ससाठी आनंदाची बातमी

तुम्ही एचडीएफसी बॅंकेचे असाल आणि स्विगी अॅपदेखील वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. तुमच्याकडे एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड असेल तर तुम्हाला कॅशबॅकचा अधिक फायदा मिळणार आहे. कारण या रचनेत आता आणखी सुधारणा करण्यात आली आहे. 

क्रेडीट कार्ड कॅशबॅकमधील बदल 21 जून 2024 पासून लागू होणार आहेत. 21 जूनपासून मिळालेला कोणताही कॅशबॅक स्विगी मनीऐवजी क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्ये दिसणार आहे. म्हणजेच कॅशबॅकमुळे पुढील महिन्याचे स्टेटमेंट शिल्लक कमी होईल. अशा प्रकारे तुमचे बिल कमी होणार आहे.